हिंगोली : अंगावरील हळद निघण्यापूर्वी नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. लग्न होऊन 20 दिवसांच्या आतच या नवविवाहितेने आयुष्य संपवलं. सासरच्या जाचाला कंटाळून तिने मृत्यूला जवळ केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी तिचा पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


हिंगोली जिल्ह्यातील मौजा इथे काल (13 एप्रिल) ही घटना घडली. पल्लवी टारफे असं नवविवाहितेचं नाव आहे. मौजा इथल्या नागोराव टारफे यांच्यासोबत पल्लवीचं 25 मार्च रोजी लग्न झालं होतं. परंतु लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळीनी त्रास द्यायला सुरुवात केली. हुंडा, फ्रीज यासह विविध वस्तू माहेरुन घेऊन ये म्हणत वारंवार त्रास दिला जायचा. यासोबतच सासरच्या मंडळींनी पल्लवीला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या जाचाला कंटाळून पल्लवीने लग्नाच्या एकोणिसाव्या दिवशी म्हणजेच काल सासरच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.


या प्रकरणी मृत पल्लवीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून तिचा पती नागोराव, सासू आणि सासरे यांच्यावर बासंबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील तिन्ही आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना लवकरच बेड्या ठोकू असं आश्वासन पोलिसांनी दिलं. परंतु लग्नाच्या अवघ्या 20 दिवसांच्या आतच नवविवाहितेने गळफास घेऊन मृत्युला कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


इतर बातम्या