Nikki Yadav Murder Case: आधी गर्लफ्रेंडची हत्या, फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह अन् संध्याकाळी भतलीशीच बांधली लग्नगाठ; निक्की यादव हत्याकांडात धक्कादायक बाब उघड
Nikki Yadav Murder Case : दिल्लीमध्ये (Delhi Crime) श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच (Shraddha Walkar Case) आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. 22 वर्षांच्या निक्की यादवची तिच्या बॉयफ्रेंडनं हत्या केलीये.
Delhi Nikki Yadav Murder Case : दिल्लीमध्ये (Delhi Crime) श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे (Shraddha Murder Case) आणखी एक हत्याकांड समोर आल्याने खळबळ माजली आहे. एका तरुणीची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केली. याप्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, त्याच दिवशी या नराधमानं दुसऱ्या मुलीसोबत लग्नही केलं. दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय निक्की यादवची (Nikki Yadav) तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली. साहिल गहलोत (Sahil Gahlot) आणि निक्की यादव लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी साहिलला अटक केली आहे.
निक्की यादवची गळा दाबून हत्या
साहिलने निक्की यादवची मोबाईल केबलनं गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या तरुणीसोबत लग्नही केलं. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. साहिल दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणार असल्याचं निक्कीला कळालं होतं. त्यानंतर निक्कीनं साहिलला जाब विचारला आणि यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानं साहिलनं रागाच्या भरात मोबाईल केबलनं गळा दाबून निक्कीची हत्या केली. ही सर्व घटना गाडीत घडली.
निक्कीचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवला
साहिलनं गाडीतच निक्कीची हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतच घेऊन तो बराच वेळ फिरत होता. त्यानंतर बाबा हरिदास नगर परिसरातील त्याच्या ढाब्यावर जाऊन निक्कीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. निक्कीला साहिलसोबत लग्न करायचं होतं, पण साहिलचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. साहिलला कुटुंबीयांच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं.
साहिलनं केलं दुसऱ्या तरुणीशी लग्न
जेव्हा निक्कीला हा प्रकार कळला, तेव्हा तिनं या लग्नाला विरोध केला, कारण तिला साहिलसोबत लग्न करायचं होतं. त्यानंतर साहिलनं निक्कीला काश्मिरी गेट परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यातच साहिलनं निक्कीचा गळा दाबून खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येनंतर त्यानं निक्कीचा मृतदेह कारमधून मित्राव गावातील त्याच्या ढाब्यावर जाऊन तेथील फ्रीजमध्ये लपवून ठेवला.
पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला साहिल?
सुत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की, एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह ढाब्यामध्ये लपवून ठेवला आहे. यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली. सध्या पुढील तपास सुरू आहे. आरोपींने मोबाईलच्या केबलने निक्कीचा गळा आवळून हत्या केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. ज्या ढाब्यात निक्कीचा मृतदेह ठेवण्यात आला होता, तोही साहिल गेहलोतचाच होता. हत्या केल्यानंतर मृतदेह कुठे ठेवायचा आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची या विचारत साहिल होता. पण पोलिसांनी साहिलला आधील पकडलं.