Nashik Crime : दारु ढोसून स्वीटच्या दुकानात धुडगूस, नाशिक पोलिसांनी अद्दल घडवत त्याचठिकाणी काढली धिंड
Nashik Crime : किरकोळ वादाच्या कारणातून दोन मद्यपी युवकांनी हातात कोयते घेत भरदिवसा एका स्वीटच्या दुकानाची तोडफोड केली होती.

Nashik Crime : किरकोळ वादाच्या कारणातून दोन मद्यपी युवकांनी हातात कोयते घेत भरदिवसा उपनगरला एका स्वीटच्या दुकानाची तोडफोड करीत नुकसान केले होते. अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढली असल्याची घटना उपनगर (Upnagar) भागात घडली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, उपनगर नाक्यावर मेघराज स्वीटचे दुकान असून, शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान दोन युवक मद्यधुंद अवस्थेत हातात कोयते घेऊन दुकानात शिरले व शिवीगाळ करीत दुकानाची तोडफोड केली. काही कळायच्या आत हा प्रकार सुरू झाल्याने ग्राहकांची व रस्त्यावर असलेली नागरिकांची धावपळ सुरू झाली.
नाशिक पोलिसांनी अद्दल घडवत त्याचठिकाणी काढली धिंड
दरम्यान, हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. उपनगर पोलिसांना घटना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची परिसरात धिंड काढण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून उपनगर ते जेल टाकीपर्यंत असलेल्या कॅनॉल रोड भागात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेले युवक नागरिकांना नाहक त्रास देत आहे. त्यांनी काही राजकीय वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे.
नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज जप्त
दरम्यान, नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ तब्बल साडेतीन लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एका महिलेसह पुरुषाला अटक करण्यात आली आहे. अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी आणि शबाना अन्सारी मूळ मालेगावचे रहिवासी असलेल्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे एमडी ड्रग्ज कुठून आणले होते आणि कुठे विक्री केली जाणार होती? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

