Nagpur Crime : भाजप नेत्या सना खान हत्येप्रकरणी मध्य प्रदेशातील आमदाराची चौकशी होणार, अमित साहूला आश्रय दिल्याची माहिती
Nagpur Sana Khan Case : अमित साहूला ज्या काही लोकांनी आश्रय दिला होता, त्यामध्ये मध्य प्रदेशातील एका आमदाराचे नाव समोर येत आहे.
![Nagpur Crime : भाजप नेत्या सना खान हत्येप्रकरणी मध्य प्रदेशातील आमदाराची चौकशी होणार, अमित साहूला आश्रय दिल्याची माहिती nagpur sana khan murder case madhya pradesh mla summoned by police marathi news update Nagpur Crime : भाजप नेत्या सना खान हत्येप्रकरणी मध्य प्रदेशातील आमदाराची चौकशी होणार, अमित साहूला आश्रय दिल्याची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/9786f4454195c065000d77af8efa22e21691826491917566_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर: भाजपच्या नेत्या सना खान हत्या प्रकरणात (Nagpur Sana Khan Case) मध्य प्रदेशातील एका आमदाराला बुधवारी नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी ही माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे. नागपूरमधील भाजप नेत्या सना खान (Sana Khan) यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. मात्र, या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशच्या आमदाराची उद्या होणारी चौकशी ही त्याचाच एक भाग आहे.
सना खान यांच्या हत्येनंतर अमित साहू ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला होता त्यांची माहिती पोलिसांनी काढली आहे. त्यापैकी काही लोकांनी अमित साहूला आश्रय दिले होते आणि त्याच अनुषंगाने मध्य प्रदेशातील त्या आमदाराला चौकशीसाठी बोलावल्याचे राहुल मदने म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी सना खान प्रकरणात कमलेश पटेल आणि रविशंकर यादव या दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीतून अमित साहूचे दोन मोबाईल पोलिसांना हस्तगत झाले आहे. त्यामध्ये काही व्हिडीओ आणि फोटो आहेत का याचा तांत्रिक तपास सुरू आहे. मात्र सना खान यांचे अनेक मोबाईल फोन अजूनही मिळालेले नाही. त्याबद्दल सना खान यांचे मोबाईल नदीमध्ये फेकल्याचे आरोपी सांगत आहेत. मात्र त्यात किती सत्यता आहे हे अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती ही पोलीस उपायुक्तांनी दिली.
अमित साहूचे मोबाईल मिळाले आहेत. त्याच्यातून व्हिडीओ मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. सना खान यांचा एक मोबाईल क्रमांक जो मागील काही दिवस अमित साहू वापरत होता, तो सना खान यांच्या हत्येनंतर काही वेळेसाठी सुरू झालेला होता. तेव्हा अमित साहूने काही व्हिडीओ फॉरवर्ड केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र ते कोणाला आणि का पाठवले, त्या संदर्भातला तपास सध्या सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.
दुसरीकडे हरदा जिल्ह्यात मिळालेल्या मृतदेहाच्या आणि सना खान यांच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी केली जात असून त्याबद्दल सॅम्पल पुन्हा घेण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी जबलपूरमधून धर्मेंद्र यादव नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तो जबलपूरचा सराईत गुन्हेगार असून 2 ऑगस्टला सना खान यांची अमित साहूने हत्या केल्यानंतर धर्मेंद्र यादव आणि अमित साहू सतत एकमेकांच्या संपर्कात होते.
धर्मेन्द्र यादव याने सना खान यांचे अनेक मोबाइल फोन तसेच अमित साहूचे मोबाईल फोन लपवण्यात अमित साहूला मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली आहे. धर्मेंद्र यादव च्या मदतीने लपवण्यात आलेल्या मोबाईल फोनमधून या प्रकरणाचे पुढचे धागेदोरे समोर येऊ शकतात अशी अपेक्षा पोलिसांना आहे.
ही माहिती वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)