आधी चॅट, मग अश्लिल व्हिडीओ कॉल अन् नंतर ब्लॅकमेलिंग; 'सेक्सटॉर्शन' प्रकाराने पोलिसांची डोकेदुखी वाढली
सेक्सटॉर्शन या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक होऊन ते व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
नागपूर : आतापर्यंत एक्सटॉर्शन म्हणजेच खंडणी वसूल करण्यासंदर्भात अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील. मात्र, आता 'सेक्सटॉर्शन' हे नवीन प्रकार पोलिसांची डोकेदुखी वाढविणारे ठरत आहे. कारण व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करुन ते व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अशा सेक्सटॉर्शन संदर्भातल्या तक्रारी वाढल्या आहेत. फसवणूक झालेले बहुतांशी लोकं पोलिसांना रीतसर तक्रार न करताच मदतीसाठी याचना करतायेत
आतापर्यंत विविध पेमेंट गेटवेच्या नावाखाली आर्थिक गुन्हे घडविणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी त्यांचा मोर्चा आंबटशौकिनांकडे वळविला आहे. त्यासाठी काही तरुणींचा खुबीने वापर केला जातोय. सुरुवातीला फेसबुकवर येणाऱ्या प्रायव्हेट मॅसेजद्वारे तुमचा मोबाईल नंबर मागितला जातो. आणि नंतर सुरु होते चॅटिंगची मालिका. चॅटिंग करताना ह्या तरुणी केव्हा जवळीक गाठतात हे समोरच्याला कळत सुद्धा नाही. ह्या तरुणी हळूहळू अश्लील बोलत व्हिडीओ कॉल करायला उद्युक्त करतात. आणि मग ठरलेल्या वेळी व्हिडीओ कॉल केला जातो. तो व्हिडीओ कॉल संपताच धमकीचे मेसेज येऊन व्हिडीओ कॉलवरील रिकॉर्ड केलेले अश्लील चाळे वायरल करण्याची धमकी देऊन हजारो, लाखो खंडणी स्वरूपात उकळले जातात. हेच सध्या सेक्सटॉर्शन एका नव्या प्रकारच्या गुन्ह्याच्या स्वरूपात पोलिसांची डोकेदुखी वाढविणारे ठरले आहे.
यातील एक संभाषण वाचा.. "आपके पास सिर्फ 15 मिनिट का समय है, उसके बाद आपका व्हिडीओ युट्युब पार अपलोड कर दूंगी". "आपकी पुरी फ्रेंड लिस्ट मेरे पास है. जितना लेट रिप्लाय दोगे उतना ये व्हिडीओ वायरल होगा". "बोलो हाँ या ना, आपकी व्हिडीओ अपलोड की जा रही है". "आपके पास सिर्फ 15 मिनिट है, 21 हजार दो. जल्दी बोलो क्या करना है, ठीक है 11 हजार दो". ह्या पद्धतीने ब्लॅकमेलिंगचे प्रकार नागपूरसह प्रत्येक शहरात घडत असून अगदी डॉक्टर्स, वकील, इतर प्रोफेशनल्स, श्रीमंत व्यापारी हे अशा सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत.
दरम्यान, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अशा सर्व प्रकरणात कुठे तरी फसवणूक झालेल्या पीडितांचेही चुकत आहे. कारण फसवणूक झालेले लोकच अशा अश्लील साईट्सवर गेले होते. शिवाय चाळीशी आणि पन्नाशीच्या उंबरठ्यावरील हे लोकं डिजिटली तेवढे साक्षर नाहीत. माझाच तर फोन आहे, कोण पाहणार, एकदा व्हिडीओ कॉल केला तर काय होईल, कोणाला माहीत पडणार नाही अशा मानसिकतेतून केलेले हे व्हिडीओ कॉल शेवटी त्यांना महागात पडत आहे.
फक्त नागपूर पोलिसांकडेच गेल्या काही आठवड्यात अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पीडितांपैकी अनेक लोकं तर फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांना तापसाआधी अशांना शांत करून त्यांची समजूत काढावी लागली. पोलिसांनी सर्व प्रकरणात गुन्हे दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र, हे सायबर गुन्हेगार आणि त्यांच्या सोबतच्या तरुणी कुठे तरी लांब बसून हे खेळ खेळत असल्याने अद्यापपर्यंत कोणीही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.