(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime: गुंडाना जमावाने ठेचून मारणे हा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा इतिहासच आहे....
नागपुरात रविवारी एका गुंडाची जमावाने हत्या केली. पण ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही नागपुरात जमावाने अनेक गुंडांना ठेचून मारले आहे. पोलिसांचे दुर्लक्ष आणि जमावाची हिंसक मानसिकता या दोन्ही गोष्टी समाजासाठी घातक आहेत. (Nagpur Crime )
नागपूर: नागपूर हे क्राईम कॅपिटल आहे असा आरोप नेहमीच केला जातो. नागपुरात विजय वागधरे नावाच्या गुंडाचा जमावाकडून दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुंडाने कुंभारपुरात एका अल्पवयीन मुलाला चाकू मारुन जखमी केल्यानंतरही पोलीस कोणतीही कारवाई करत नाही, उलट तो गुंड पुन्हा वस्तीत येऊन शिव्या देतो, हे पाहून जमाव संतापला आणि त्या ठिकाणी हत्येची घटना घडली. अर्थात नागपुरात जमावाकडून एकाद्या गुंडाला ठेचून मारण्याची घटना ही काही पहिलीच नाही.
नागपुरात या आधीही जमावाकडून गुंडाच्या हत्या करण्यात आल्या आहेत. बहुतेक प्रकरणात असं लक्षात आलं आहे की त्या गुंडांनी समाजात उच्छाद मांडला असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे जमावानेच कायदा हातात घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
नागपुरात आजवर जमावाकडून गुंडांच्या हत्येच्या मोठ्या अशा सात घटना घडल्या आहेत. ही सर्व प्रकरणे राज्यात गाजली. त्यामध्ये 14 एप्रिल 1998 साली वैशाली नगर परिसरात गफ्फार डॉन या नावाने कुख्यात असलेल्या गुंडाला जमावाने जाळून मारल्याची घटना घडली होती. गफ्फार डॉन हा परिसरातील महिलांची छेडछाड करायचा. तसेच त्याच्यावर बलात्काराचे अनेक आरोप होते. पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होऊन त्यांनी गफ्फार डॉनला जिवंत जाळले.
नागपुरात पुन्हा जमावाकडून गुंडाची हत्या; दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून विजय वागधरेचा खून
त्यानंतर 17 जुलै 1999 साली नागपुरातील पंचशीलनगर परिसरातील बबलू नावाच्या गुंडाची जमावाने हत्या केल्याची घटना घडली. हा बबलू या परिसरातील नागरिकांकडून खंडणी घ्यायचा, त्यांना त्रास द्यायचा. पोलिसांकडे अनेकदा तक्रार येऊनही त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. मग शेवटी जमावानेच कायदा हातात घेतला आणि बबलूला दगडाने ठेचून मारले.
नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील रणजीत डहाट या गुंडाचीही 15 डिसेंबर 1999 साली हत्या झाली. त्याच्यावर बलात्कार, हत्या आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल होते. गफ्फार डॉन प्रमाणेच रणजीत डहाटलाही जमावाने जिवंत जाळले.
नागपुरातील भारत यादव उर्फ अक्कू यादव या गुंडाला जमावाने ठेचून मारल्याची घटना आजही अनेकांच्या स्मृतीत आहे. महिलांची छेड काढणे, बलात्कार आणि खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असतानाही पोलीस त्याच्या विरोधात कडक कारवाई करत नाहीत याचा परिसरातील नागरिकांना राग होता. त्यामुळे 13 ऑगस्ट 2004 रोजी जमावाने भारत यादवला कोर्टातच ठेचून मारल्याची घटना घडली.
नागपुरातील खरबी परिसरातील फहीम आणि नईम हे नावाजलेले गुंड. परिसरातील नागरिकांकडून खंडणी गोळा करणे आणि लोकांना मारहाण करणे हे त्यांचे काम. त्यांच्या अनेक तक्रारी येऊनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे या गुंडांनी उच्छाद मांडला होता. शेवटी भारत यादवला ज्या प्रमाणे जमावाने मारलं तसंच खरबी परिसरातील नागरिकांच्या जमावाने 12 ऑक्टोबर 2004 रोजी फहीम आणि नईमला दगडांनी ठेचून मारलं.
नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू
त्यानंतर या घटना वारंवार घडू नयेत म्हणून पोलिसांनी अशा गुंडांवर कडक कारवाई करण्यास सुरु केली. त्यामुळे शहरातील गुन्हे काही प्रमाणात कमी झाले. पण नंतर पुन्हा हे गुंड आपले डोके वर काढू लागली. नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात असाच एक इक्बाल नावाचा कुख्यात गुंड होता. तो आपल्या भावाच्या मदतीने या वस्तीत जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर अनेक महिलांचे बलात्कार केल्याचे आरोप दाखल होते. त्याच्या या कृत्यांना विरोध करणाऱ्यांना इक्बालने ठार मारुन त्यांचे प्रेत हे वस्तीत पुरले होते. हे सर्व माहित असूनही पोलिसांकडून त्याच्यावर कडक कारवाई होत नव्हती. त्यामुळे 9 ऑक्टोबर 2012 साली या परिसरातील जमावाने लाकडी दंडूके आणि दगडांच्या सहाय्याने त्याची हत्या केली.
असेच प्रकरण नालंदा चौक परिसरातही घडले. शांतीनगरच्या नालंदा चौकात आशिष देशपांडे नावाचा गुंड रहायचा. तो नेहमी या परिसरातील अरुंद गल्ल्यातून जोरात दुचाकी पळवायचा. या शिवाय दारुच्या आणि अमली पदार्थांच्या नशेत तो या परिसरातील महिलांना अश्लील शिवीगाळ करायचा. शेवटी लोकांचा संयम सुटला आणि जमावाने त्याची फरशीचे तुकडे, दगडांच्या सहाय्याने हत्या केलीय
रविवारी जिथं उभं राहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर क्राईम कॅपिटल असून त्यास फडणवीस जबाबदार आहेत असा आरोप केला होता, तिथून अवघ्या 500 मीटर अंतरावर विजय वागधरे नावाच्या गुंडाचा जमावाकडून दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून खून करण्यात येत होता.
नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये लोकांनी स्थानिक गुंडाना जीवे मारल्याचा आजवर अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा गुंडांचा बंदोबस्त करण्यात नागपूर पोलीस किती सक्षम आहेत असा प्रश्न निर्माण होतो. मग नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होतो आणि जमावाच्या रुपात गुंडांची हत्या केली जाते. नागपुरात हेच वारंवार समोर आलं आहे. मात्र, समाजाची ही भूमिका भविष्यात किती धोकादायक ठरु शकते याची ना पोलिसांना काळजी आहे ना राज्यकर्त्यांना.
आधी फेसबुकवरुन मैत्री नंतर व्हॉट्सअपवर अश्लिल व्हिडीओ चॅट.. अन् त्यानंतर ब्लॅकमेलचा फोन