(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : भारत गॅस एजन्सी देण्याच्या बहाण्याने शिक्षकाला 15 लाखांचा चुना, आरोपीला बेड्या
गुगलवर भारत गॅस एजन्सी सर्व्हिस सर्च करणं शिक्षकाला महागात भारत गॅस एजन्सी देण्याच्या बहाण्याने शिक्षकाला 15 लाखांचा चुना 12 बॅंक खाती गोठवली तर 15 मोबाईल सिमकार्ड आणि 15 हजार रुपये जप्त
मुंबई : भारत गॅस एजन्सी देण्याच्या बहाण्याने शिक्षकाची 15 लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील समतानगर इथल्या उत्तर सायबर विभाग पोलिसांनी त्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली. नितीश कुमार (वय 26 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
आरोपीने गुगलवर बनावट वेबसाईट बनवून त्याद्वारे भारत गॅस एजन्सी देण्याचा दावा करायचा. पैसे स्वीकारण्यासाठी त्याने बनावट बँक खातीही तयारी केली होती.
तक्रारदार शिक्षकाने भारत गॅस एजन्सीच्या शाखेकरता गुगलवर सर्च केलं असता त्याला या आरोपीने तयार केलेली बनावट वेबसाईट सापडली. ती वेबसाईट खरी मानून शिक्षकाने आरोपीशी संपर्क केला आणि त्याच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या 15 बॅंक खात्यांमध्ये 15 लाख 44 हजार रुपये पाठवले. काही दिवसात तुम्हाला भारत गॅस एजन्सी मिळेल असं सांगून आरोपीने मोबाईल फोन बंद केला तो परत कधी सुरुच केला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं शिक्षकाच्या लक्षात आलं आणि त्याने पोलिसात धाव घेतली.
मुंबईच्या दिंडोशी इथे राहणाऱ्या शिक्षकाने प्रतापगड इथे आपल्याला गॅस एजन्सी मिळावी याकरता गुगलवर सर्च केले आणि LPGVITARAKCHANCE.ORG या वेबसाईटवर जाऊन आवश्यक ती सर्व माहिती भरली. तेव्हा त्यांना गॅस कंपनीकडून बोलतोय असं सांगून संपर्कही करण्यात आला. यावेळी शिक्षकाकडून 15 विविध बॅंक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितलं. 10 जानेवारी ते 27 मार्च या दरम्यान शिक्षकाने ही रक्कम ट्रान्सफर केली. नितीश कुमार सिंह नावाच्या एका तरुणाने शिक्षकाशी संपर्क केला आणि 20 दिवसात गॅस एजन्सी मिळेल असं सांगितलं. 20 दिवसानंतर जेव्हा शिक्षकाने त्या तरुणाला संपर्क केला तेव्हा मात्र त्याचा फोन नंबर बंद आला आणि आपली फसवणूक झाल्याचं शिक्षकाच्या लक्षात आलं. तेव्हा शिक्षकाने उत्तर मुंबई सायबर विभागात जाऊन तक्रार केली.
शिक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवली आणि तांत्रिक तपास करत नितीश कुमार या 26 वर्षीय तरुणाला औरंगाबाद इथून अटक केली. नितिश कुमारकडून 12 विविध बॅंक खात्यांची माहिती, 15 मोबाईल फोन, 15 सिमकार्ड जप्त केले. पोलिसांनी ही बॅंक खाती तात्काळ गोठवली. कारण या बॅंक खात्यातील पैसे बिहार इथून काढले जात होते. तसंच नितीश कुमार हा तरुण देखील बिहारचा राहणारा आहे. बी.कॅाम पदवीधर असलेल्या नितीशवर दिल्ली, मुंबईसह औरंगाबाद इथे अनेक सायबर फ्रॉडचे गुन्हे दाखल आहेत.