कल्याण : फॉरेन एक्स्चेंज मनी करन्सीमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कल्याण पूर्वेतील अनेक महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महिलेला आज ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनिता गावंडे असं या महिलेचं नाव असून ती साडी विक्री करण्याच्या नावाखाली महिलांशी मैत्री करायची व विश्वास संपादन करत महिलांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवत महिलांना लुबाडायची. याबाबत कोलशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत तब्बल दोन वर्षांनी तिला अटक केली आहे. आजमितीला तिने 1 कोटी 26 लाखांचा गंडा घातल्याचे उघड झालंय तर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे . फसवणूक करणाऱ्या या महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महिलांनी केली आहे.


कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पारिसरात सुशील अर्पाटमेंटमध्ये राहणारी अनिता गावंडे ही महिला तिच्या घरातून साडी विक्रीचा व्यवसाय करीत होती. या व्यवसायाच्या आडून तिने अनेक महिलांशी मैत्री करत फॉरेन एक्सचेंजमध्ये पैसे गुंतवल्यास पैसे दुप्पट होतील असे आमिष महिलांना दाखविले. अनेक महिलांनी पैसे दुप्पट होण्याच्या आमिषाला बळी पडत अनिताला पैसे दिले. मात्र दोन वर्षे उलटूनही पैसे परत न मिळाल्याने या महिलांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं .


2018 मध्ये या महिलांनी कोळशे वाडी पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार नोंदवली. याच दरम्यान अनिताने राहत्या घरातून कुटुंबासह पळ काढला. या गुन्ह्याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करत होती. गुन्हा दाखल झाल्यावर अडीच वर्षानंतर अनिता हिला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांच्या पथकाने अनिताला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यात अनिताचा पती रवींद्र गावडेदेखील सहभागी होता. या महिलेने अजून किती महिलांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करत आहे.


संबंधित बातम्या :