नाशिक : लग्नानंतर सुरुवातीचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील वडकीनाला येथे राहणाऱ्या निलेश दरेकरच्या लग्नाची हौस-मौज अवघे काही तासच टिकली. कारण, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी निलेशला लुटून पळाली. नवरीच्या गळ्यात घातलेलं दागिने घेऊन ती पसार झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आईला भेटायला जाते असं सांगून गेलेली मुलगी परतलीच नाही.


पुणे जिल्ह्यातील वडकीनाला येथे राहणारा निलेश दरेकर हा वडापाव व्रिक्री करुन आपले घर चालवत होता. लग्न जमत नसल्याने त्याने नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे आपल्या मामाला आणि त्यांच्या मुलांच्या मार्फत लग्न जमवावे यासाठी प्रयत्न सुरु केले. मामाच्या मुलांच्या मनमाड येथील मित्रांच्या मदतीने रावळगाव येथे राहणाऱ्या भवानी बाबा हे लग्न जुळवत असे सांगितल्यानंतर निलेश त्यांच्या संपर्कात आला. बाबाने चांगली मुलगी दाखवितो असे सांगत त्यांच्याकडून 50 हजाराची मागणी केली. त्यानंतर त्यांनी तीन मुलीचे फोटो त्यांना मोबाईल वरुन पाठविले. त्यातील एक मुलगी निलेश दरेकर याला पसंत पडली. ही मुलगी नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एकरुखी या गावात राहणारी होती.


मुलगी पसंत पडल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुलीच्या आईला तीन लाख रुपये द्यावे लागतील असे भवानी बाबा याने निलेशच्या कुटुंबाला सांगितले. मागील वर्षी कोरोनामुळे जून महिन्यात कोपरगाव येथील कोर्ट बंद असल्याने सर्वांनी नांदगाव येथे येऊन मामाच्या घरी गंगाधरी येथे संध्याकाळी शेतात लग्न लावण्याचा मुर्हत ठरला आणि त्यानुसार निलेशचा विवाह संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण झाल्यानंतर नवरीला फोन आला आणि तिची मामी तिला आईची तब्बेत खराब झाली असं सांगून तेथून घेऊन गेली. त्यांनतर निलेश याने आपल्या बायकोला अनेकदा फोन केले. मात्र, नवरी मुलगी पुन्हा परतलीच नाही.


प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराची 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या


लग्नांतर सत्यनारायण पुजा झाल्यानंतर नववधू तीन लाख 99 हजारांचा ऐवज घेऊन फरार झाल्याचं लक्षात येताच निलेश दरेकर याने काल (9 फेब्रुवारी) नांदगाव पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी एका सामाजिक महिलेच्या माध्यमातून ही तक्रार नांदगाव पोलिसांनी दाखल करुन घेतली. संतोष उगलमुगले (मालेगाव) योगेश वाघ, बालाजी आहेर, विजय चव्हाण (रावळगाव) पुजा शिंदे (एतरुखे ता. राहता. जि. नगर) मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शितल मोरे या सर्वांविरोधात नांदगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून नांदगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे.


या पुर्वीही नांदगाव तालुक्यातील एका तरुणाला दहा विवाह करुन अकरावा नवरा करणाऱ्या तरुणीने फसविल्याची घटना घडली होती. त्यावेळी असेच रॅकेट पोलिसांनी उघड केले होते. त्यानंतर आता पुन्हा हा प्रकार घडल्याचं प्रकरण समोर आलय. वर आणि वधू हे दोघे बाहेरच्या जिल्ह्यातील असले तरी त्यांचा विवाह नांदगाव तालुक्यात झाल्याने त्याची तक्रार नांदगाव पोलिसात झाली असून पोलिस या आरोपांचा शोध घेत आहे.