मुंबई : ॲानलाईन फसवणुकीमुळे रोज लाखो मुंबईकरांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक होते. एखाद्याची ॲानलाईन फसवणूक झाली आणि त्याचे पैसे परत मिळालेत, असं कधी ऐकलय का? पण असा चमत्कार मुंबईतच झालाय आणि तो ही करुन दाखवलाय मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने.


मुंबई राहणारे मनोज शहा हे मुंबईतील मोठे स्टील व्यापारी आहेत. 25 जानेवारी रोजी दुपारी मनोज शहा यांच्या खात्यातून 12 लाख 70 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला होता. पण मनोज शहा यांनी ते पैसे काढले नव्हते किंवा त्यांनी कोणाला चेकही दिला नव्हता. मनोज शहा यांनी तत्काळ बँकेत फोन केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाली होती, पण आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. खरं तर ऑनलाईन फसवणूक झाल्यावर पैसे परत मिळत नाही, पण मनोज शहा यांना मात्र त्यांचे पैसे परत मिळाले. खरं तर ही कमाल मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची आहे.


मनोज शहा यांच्या खात्यातून पैसे ऑनलाईन काढून घेण्यात आले होते. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मुंबई सायबर सेल पोलिसांशी संपर्क केला. मनोज यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ याप्रकरणाची दखल घेऊन सूत्र हलवली. त्यानंतर पोलिसांनी मनोज शहा यांचे पैसे परत मिळवून दिले.


मुंबई सायबर सेलमुळे मनोज शहा यांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले. पण मनोज शहा यांनी हुशारी दाखवत तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. अशीच हुशारी जर सर्वांनी दाखवली तर अशी फसवणूक टाळतां येईल, असं सायबर तज्ञांचे म्हणणे आहे.


सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईला जेवढे नुकसान दहशतवादी हल्ल्यांतून झाले नसेल, त्याच्या कित्येक पटीने जास्त या अशा सायबर हल्ल्याने मुंबईचे नुकसान झाले आहे. अजूनही होत आहे. अशा सायबर हल्ल्यापासून सायबर पोलीस तुमचे काही प्रमाणात सरंक्षण करु शकतील, पण अशा ऑनलाईन होणाऱ्या आर्थिक हल्ल्यापासून तुम्हीच तुमचे सरंक्षण करु शकता. त्यामुळए प्रत्येक आर्थिक व्यवहारात "सावधगिरी" बाळगणं गरजेचं आहे.