भोपाळ : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य चिंतीत आहेत. तर भाजपच्या एका खासदाराने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. भाजपचे खासदार महेंद्रसिंग सोलंकी यांनी भोपाळमध्ये म्हटलं की, जर पेट्रोलचे दर वाढत असतील तर त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचं खापर सोलंकी यांनी 55 वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीवर फोडलं आहे.
भाजप खासदार सोलंकी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे. एकट्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. या देशाचे दुर्दैव हे आहे की 55 वर्ष येथे कॉंग्रेस सरकारने राज्य केले. त्यांनी येथे अशी कोणतीही पायाभूत सुविधा निर्माण केलेली नाहीत, ज्यामुळे या किंमती वाढण्यास प्रतिबंध होईल. परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग नवव्या दिवशी वाढ
देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100.07 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96 आणि डिझेलचे दर 86.97 रुपये आहेत. इतर शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे.