Crime: सावधान! इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तीन आरोपींची टोळी जेरबंद
Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा युनिटने मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांना इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचे अमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींच्या टोळीला अटक केली आहे.
Mumbai Cyber Crime: मुंबई शहरात (Mumbai City) ज्येष्ठ नागरिकांना इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचं (Insurance policy maturity) आमिष दाखवून आणि तरुणांना OLX वर नोकरीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे. घाटकोपर परिसरात (Ghatkopar News) राहणारा ड्रायफ्रूट होलसेल व्यापाऱ्याला काही महिन्यापूर्वी या आरोपींनी फोन करून त्यांची इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचा अमिष दाखवून साडेचार कोटींचा गंडा घातला होता. याच प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा सायबर विभागांनी मागील पंधरा दिवसांपासून मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांची इन्शुरन्स मॅच्युरिटीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.
नोएडा परिसरामध्ये एका बोगस कॉल सेंटरवर कारवाई
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर टीमने तांत्रिक तपास करून दिल्लीतील नोएडा परिसरामध्ये एका बोगस कॉल सेंटरवर कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींची नाव अनुज कुमार साहा, संदीप कुमार लालता प्रसाद, रवी कुमार सरोज सिंह असे आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी स्पर्धा परिसरामध्ये राहणारे आहेत. अटक केलेल्या आरोपींनी मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांची जवळपास साडेपाच कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे.
हे आरोपी नोएडामध्ये एका कॉल सेंटरच्या माध्यमातून मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुणांना OLX वर नोकरी मिळवून देतो आणि ज्येष्ठ नागरिकांना इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचे जास्त पैसे मिळणार असल्याचं अमिष दाखवत फसवणूक करत होते.
बनावट कागदपत्रांच्या आधारे 25 पेक्षा जास्त बँकेत अकाऊंट
आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 25 पेक्षा जास्त बँकेत अकाऊंट उघडले होते आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे या आरोपींनी मोठ्या संख्येमध्ये सीमकार्ड देखील घेऊन मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांना कॉल करून फसवणुकीचा नेटवर्कच चालवलं होतं. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या आरोपींकडून 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत तर या आरोपींकडून 20 लाख 50 हजार रुपये देखील जप्त केले आहेत.
आरोपींकडून पोलिसांनी लोकांची फसवणूक करण्याकरता तयार करण्यात आलेले फोन नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड, आयकर विवरणासह 12 मोबाईल आणि 3 लॅपटॉप जप्त केले आहेत. या तिन्ही आरोपींसोबतचे आणखी दोन साथीदार फरार झाले असून त्यांच्या शोध देखील आता मुंबई पोलिसांची सायबर टीम घेत आहे.
सायबर पोलिसांकडून आवाहन
दरम्यान मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून सावधान राहावे. जर त्यांच्यासोबत ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर त्यांनी त्वरित मुंबई पोलिसांच्या टोल फ्री नंबर 1930 वर संपर्क करावा, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.