Mumbai Crime News : मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा
Mumbai Crime News : पाच महिन्यांपासून मुलगी बेपत्ता. शोधून थकलेल्या वडिलांची पोलिसांत धाव. पण त्यानंतर जे समोर आलं, त्यानं अवघा देशच हादरला...
Mumbai Crime News : दिल्लीत (Delhi) सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण दिल्ली हादरली होती. साधारणतः पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच, मे 2022 मध्ये एक हत्या झाली होती. आता या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. यामध्ये या प्रकरणातील मुंबई (Mumbai Crime News) कनेक्शन समोर आलं आहे. दिल्लीत पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. याच प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असून याप्रकरणी एका आरोपीलाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आफताब अमीन पूनावाला नावाच्या व्यक्तीनं कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा वालकर या महिला सहकाऱ्याला लग्नाच्या बहाण्यानं मुंबईहून दिल्लीला आणलं. काही दिवसांनी श्रद्धानं त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तेव्हा आफताबनं तिची हत्या करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली."
हत्या झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडिल 59 वर्षीय विकास मदन वालकर यांनी 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील मेहरौली पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या अपहरणाचा एफआयआर दाखल केला होता. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंबीयांसह पालघरमध्ये राहत होते. त्यांची 26 वर्षीय मुलगी श्रद्धा वालकर ही मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. इथेच श्रद्धाची आफताब अमीनशी भेट झाली. लवकरच दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण श्रद्धाच्या कुटुंबीयांना यासंदर्भातील माहिती मिळताच त्यांनी श्रद्धा आणि आफताबच्या नात्याला विरोध करण्यास सुरुवात केली.
श्रद्धाचे वडिल विकास वालकर यांनी सांगितलं की, "कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केल्यामुळे दोघांनीही मुंबई (Mumbai News) सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, ते दोघेही दिल्लीतील महरौलीमधील छतरपूर भागात राहतात. आमच्यापर्यंत मुलीची माहिती कुठून ना कुठून पोहोतच होती. पण, मे महिन्यापासून तिच्याबाबत आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही. आम्ही तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आम्हाला शंका आली. त्यामुळे मी थेट दिल्लीत येऊन तिला भेटण्याचा निर्णय घेतला."
"त्यानंतर मी थेट दिल्ली गाठली आणि मुलगी राहत असलेल्या छतरपूरमधील फ्लॅटवर पोहचलो. मात्र तिथे घराला कुलूप होतं. आजूबाजूला विचारपूस केली, मात्र कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे थेट पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.", अशी माहिती मृत श्रद्धाच्या वडिलांनी दिली आहे.
Mumbai Crime News : लग्नावरुन दोघांमध्ये उडायचे खटके
पोलिसांनी टेक्निकल सर्विलांसच्या मदतीनं आरोपी आफताबला शोधून काढलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. आफताबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. आरोपी आफताबनं चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब दिल्लीत एकत्र राहत होते. त्यानंतर काही दिवसांनी श्रद्धानं त्याच्या मागे लग्न करण्याचा तगादा लावला. त्यानंतर वैतागलेल्या आफताबनं रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. 18 मे रोजी आरोपी आफताबनं श्रद्धाची धारदार चाकूनं हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे केले. ते तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरांत टाकून दिले. आरोपी आफताबच्या चौकशीनंतर पोलिसांनी काही अवशेष जंगलातून ताब्यात घेतले. सध्या आरोपी आफताब पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.