Aurangabad Crime News: दोन विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी औरंगाबाद हादरलं, पोलिसात गुन्हा दाखल
Aurangabad Crime News: याप्रकरणी औरंगाबादच्या फुलंब्री आणि कन्नड शहर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
Aurangabad Crime News: विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी औरंगाबाद हादरलं असून, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथे राहणाऱ्या 29 वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत तुझ्या लहान मुलीला मारुन टाकील अशी धमकी देऊन आरोपीने विवाहित महिलेवर कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील पाणपोई फाटा येथील लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद शफी (रा. दिल्ली गेट, औरंगाबाद) असे फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फुलंब्रीच्या नायगाव येथील मातोश्री नगर सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेने शनिवारी फुलंब्री पोलिस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदविली आहे. मातोश्री नगर सोसायटीमध्ये गेल्या दीड वर्षा पासून सय्यद शफी सय्यद हशम यांच्या घरात दीड हजार रुपये प्रती महिना असे भाड्याने पती आणि दोन मुला सोबत पिडीता राहत होती. पती औरंगाबाद शहरात एका कंपनीत कामाला जातात. आरोपी सय्यद शफी यांचे जवळच रो हाउसचे काम सुरु होते. त्यामुळे तो दररोज घरा समोर येत होता. त्याने तुझ्या मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केला.
धक्कादायक म्हणजे आरोपी सय्यद शफी याने महिलेवर वारंवार अत्याचार केला. मात्र, आरोपी सय्यद शफी याने मुलाला मारण्याची धमकी दिल्याने पीडीत महिलेने याबाबत कुणालाही सांगितले नाही. यानंतर शफी याने मागील आठवड्यातही पुन्हा अत्याचार केला. यामुळे पिडीता आत्महत्या करण्यासाठी जात असताना पतीने विचारणा केली. त्यांना सर्व आपबिती सांगितली. यानंतर 7 जानेवारीला फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड तालुक्यात विवाहित महिलेवर अत्याचार
कन्नड येथे दाखल झालेल्या दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेत सुधीर अनिल थेटे (वय 23, रा. रेल ता. कन्नड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.पीडीत महिला ही आपल्या गावातून कन्नड शहरात समर्थ नगर येथील ब्युटी पार्लरमध्ये आली होती. त्यावेळी सुधीर थेटे दुचाकीवरून तिचा पाठलाग करत तिथे आला. त्यानंतर महिलेला बळजबरीने दुचाकीवर बसवून, तुझ्या चार वर्षीय मुलीला जीवे मारून टाकील अशी धमकी देऊन तिला कन्नड औरंगाबाद रस्त्यावरील पाणपोई फाट्यावरील लॉजवर घेऊन गेला. तिथे गेल्यावर महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरल्याने महिलेने तक्रार दिली नाही. मात्र शुक्रवारी पिडीतीने कन्नड शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार कन्नड शहर पोलिस ठाण्यामध्ये आरोपी सुधीर देठेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.