Nashik Crime : मुलं क्लासवरून घरी आली, घरातलं दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली, तीन दिवसांत नाशिकमध्ये तिघांना संपवलं
Nashik Crime : एकीकडे धार्मिक नागरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये सातत्याने खुनाच्या घटना उघडकीस येत आहेत.
Nashik Crime : नाशिक शहराला झालंय काय? असा प्रश्न सध्या नाशिककर विचारत आहेत. एकीकडे धार्मिक नागरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये सातत्याने खुनाच्या घटना उघडकीस येत असल्याने नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांत तीन खुनाच्या (Murder) घटनांनी नाशिक शहर हादरले आहे.
नाशिक (Nashik) शहरात गेल्या तीन ते चार दिवसांत तीन खुनाच्या (murder) घटना समोर आल्या आहेत. नाशिकच्या सातपूर परिसरात 20 फेब्रुवारीला घरगुती वादातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करत तिची हत्या केली. तर 22 फेब्रुवारीला अंबड भागातील चुंचाळे परिसरात नवऱ्याने बायकोच्या गळ्यात सुरा खूपसून खून करत स्वतःही फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. तर निलगिरी बाग परिसरात एकतर्फी प्रेमातून विकासला संपवण्यात आले. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून आधीच गुन्हेगारीने (Crime) डोकं वर काढलेलं असतांना खुनाच्या या घटनांमुळे शहर हादरून गेलं आहे. चारच दिवसांत तब्बल तीन खुनाच्या घटना समोर आल्याने नाशिककर दहशतीखाली आहेत.
सातपूर भागातही शिवाजीनगर परिसरात 20 फेब्रुवारीला खुनाची घटना घडली. यात मयत मीरा पिनू पवार आणि पिनू सोमनाथ पवार हे दाम्पत्य मोलमजुरी करून राहत होते. यातील नवऱ्यास दारूचे व्यसन असल्याचे तो रोज दारू पिऊन येत असल्याने दोघांमध्ये भांडण होत असे. मंगळवारी सायंकाळीही अशाच भांडणातून दोघांमध्ये मोठा वाद झाल्याने रागाच्या भरात पिनू पवार याने मीराला लाकडी दांड्याने मारहाण करत, तिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने (Wife Murder) जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरमन तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
दुसरी घटना अंबड चुंचाळे परिसरात घडली या घटनेत भुजंग तायडे हा हा कुटुंबासमवेत राहत होता. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्नी मनीषा तायडे हिच्या मानेवर चाकूने वार करीत गळा चिरून ठार केले. यानंतर स्वतः भुजंग याने स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेननंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र आतून कुणीही आवाज न दिल्याने मुलांनी शेजारच्यांना ही बाब सांगितली. शेजारच्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता समोरील दृश्याने मुलांसह शेजारच्याचे डोळे विस्फारले.
तिसरी घटना हि नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील निलगिरी बाग परिसरात घडली. विकास नलावडे या 25 वर्षीय तरुणाला मारहाण तसेच धारदार शस्त्राने वार करत त्याला जीवे ठार मारण्यात आले आहे. विकासचे त्याच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. यासाठी तो वारंवार तिचा पाठलागही करायचा, अनेक वेळा त्याने तिला प्रपोज करत लग्नाची मागणी देखील घातली होती. मात्र संबंधित तरुणी यासाठी तयार नव्हती. काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी विकासची समजूत देखील घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विकास काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हाच राग मनात धरत अपार्टमेंटच्या समोरच असलेल्या मैदानात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुलीचा भाऊ अमोल साळवे, मामा सुनील मोरे आणि जावई राहुल उजगीरे यांनी विकासला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तसेच धारधार शस्त्राने वार करत त्याला संपवले.