आई नोकरीला जाताच साधली संधी, 53 वर्षीय व्यक्तीकडून 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, पॉक्सो अंतर्गत अटक
Mumbai Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथे 8 वर्षांची मुलगी कुटुंबासोबत राहते. तिच्या आईला काही महिन्यांपूर्वी नोकरी मिळाली होती.
Mumbai Crime : मुंबईत अंधेरी येथे 53 वर्षीय व्यक्तीला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे मेघवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कुटुंबाच्या ओळखीच्या फायदा घेऊन या आरोपीने संधी साधल्याचं सांगण्यात येत आहे.
आई नोकरीला जाताच साधली संधी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथे 8 वर्षांची मुलगी कुटुंबासोबत राहते. तिच्या आईला काही महिन्यांपूर्वी नोकरी मिळाली होती. हे कुटुंब इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत असे. तर पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीही त्याच इमारतीच्या तळमजल्यावर कुटुंबासह राहतो. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीची आई कामाला लागल्यावर तिने आपल्या मुलीचा सांभाळ या कुटुंबावर सोपवला. आणि तिथेच त्या आईची चूक झाली.
मुलीसोबत शारीरिक अत्याचार
आई कामावर गेल्यानंतर या कुटुंबातील एका 53 वर्षीय व्यक्तीने या मुलीसोबत गैरवर्तन करत शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर एके दिवशी, मुलीने तिच्या आईला या पुरुषाच्या अयोग्य वर्तनाबद्दल सांगितले. 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
53 वर्षीय व्यक्तीला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक
आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आईला समजताच, आईने तातडीने 53 वर्षीय व्यक्तीविरुद्ध कलम 4 (पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
25 सप्टेंबर रोजी मेघवाडी पोलिस स्टेशनमध्ये 8 (लैंगिक अत्याचार), आणि 12 (लैंगिक छळ) नुसार प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यानुसार मेघवाडी पोलिसांनी त्याला त्याच दिवशी अटक केली आहे. पीडित मुलगी सध्या केईएम रुग्णालयात दाखल आहे.
POCSO कायदा म्हणजे काय?
देशात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत, अशात बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालता यावा यासाठी सरकारने POCSO कायदा लागू केला आहे. जेव्हा लहान मुलांवर मानसिक किंवा शारीरिक शोषण केले जाते तेव्हा त्याला बाल शोषण म्हणतात. बाल शोषण म्हणजे अल्पवयीन मुलांसोबत मानसिक किंवा शारीरिक अत्याचार करणे असा याचा अर्थ होतो. अनेकदा अशा गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या व्यक्ती या आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, मित्र, शेजारी किंवा जवळचेच लोक असतात. असे गुन्हे रोखण्यासाठी आणि असे करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र सरकारने बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याशी संबंधित कायदा करून बाल लैंगिक अपराध संरक्षण नियम- POCSO बनवले आहेत.
ही बातमी वाचा: