रिक्षावर लागलेल्या जाहिरातीमुळे सुरक्षा रक्षकाच्या हत्येचा 12 तासात उलगडा, मानपाडा पोलिसांची कारवाई
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील विजय पेपरमिल या बंद असलेल्या कंपनीमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.
डोंबिवली : रिक्षावर लावण्यात आलेल्या जाहिरातीमुळे हत्येच्या गुन्ह्यातील दोन आरोपीला अवघ्या 12 तासात अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलंय. त्यांचे दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. डोंबिवली एम आय डी सी परिसरात विजय पेपर मिल या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती. कंपनीतील सामान चोरीला गेल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा संशय पोलिसांना होता. तपासाचा हाच धागा पकडत पोलिसांना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले त्यांना एक रिक्षा संशयास्पद आढळली याच रिक्षावर जाहिरात होती. मानपाडा पोलिसानी अवघ्या आठ तासात ही रिक्षा शोधून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी टोनी थॉमस डिसिल्वा उर्फ शिवा सोमा हिलंम याला अटक केली आहे.
टोनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आधी देखील चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला दीड लाख किमतीचा मुद्देमाल रिक्षा हस्तगत केली. टोनीने चोरीचे भंगार फिरोज खान या भांगरवाल्याला विकले होते. पोलिस फिरिजला देखील अटक केली आहे. मयत सुरक्षा रक्षकाने चोरी करण्यात विरोध केल्याने आपल्या दोन साथीदारांसह त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करत त्याची हत्या केल्याची कबुली टोनीने दिली आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील विजय पेपरमिल या बंद असलेल्या कंपनीमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानबहादुर गुरुम असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाच नाव आहे. मृतदेहाच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने प्रहार केल्याच्या खुणा होत्या. तसेच कंपनीतील भांगरतील सामानही चोरी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. एका सीसीटिव्ही मध्ये बुधवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास काही इसम एक रिक्षात काही सामान घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता मात्र रिक्षावर जाहिरात लागली होती पोलिसांचा या रिक्षांवर संशय बळावला. याच बॅनरच्या आधारे मानपाडा पोलिसांच्या पथकाने या रिक्षाचा शोध सुरू केला.
या परिसरातील सर्व रिक्षांचा तपासणी करण्यात आली. या दरम्यान एका रिक्षावर सदरचा बॅनर कापलेला असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. पोलिसांनीही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा ड्रायव्हरने पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत या रिक्षाचालकाला पकडले त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपल्या दोन साथीदारांसह या सुरक्षारक्षकाची हत्या केल्याची कबुली दिली.
चोरी केलेलं भंगार त्याने फिरोज खान नावाच्या एका भंगारवाल्याला विकले होते. पोलिसांनी चोरीचा भंगार विकत घेतल्या प्रकरणी फिरोज खान याला देखील बेड्या ठोकल्यात. 15 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास टोनी उर्फ शिवा हा आपल्या दोन साथीदारांसह ऑटोरिक्षातून विजय पेपर मिल कंपनी जवळ गेला होता. कंपनीत प्रवेश करतात याने कंपनीचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न केला. या वेळेस सुरक्षारक्षक ज्ञान बहादुर जाग आली त्याने आरडाओरड करत विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या टोनी व त्याच्या दोन साथीदारांनी एका लोखंडी रॉडने ज्ञानबहादूर याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर या तिघांनी कंपनीमधील कासा तांबे पितळ व इतर भंगाराचे तुकडे असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
87 कंपन्या बंद मात्र कंपनीत सीसीटिव्ही आणि सुरक्षा रक्षक ठेवला
डोंबिवली एमआयडीसी परिसरात तब्बल 87 कंपन्या या बंद अवस्थेत आहेत. बंद व भग्नावस्थेत उभा असलेला या कंपन्या सध्या गुन्हेगारीचा अड्डा ठरू लागल्या. या कंपन्यांच्या विस्तीर्ण आवारात अवघा एक सुरक्षारक्षक ठेवण्यात आलाय. कंपनी बंद असली तरी देखील सुरक्षिततेसाठी कंपन्यांमध्ये सुरक्षारक्षक वाढवावेत त्याचप्रमाणे कंपनी व कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बस बसवावा जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाहीत असे आवाहन डोंबिवली एसीपी सुनील कुराडे यांनी यावेळी केलंय.