कोलकाता : झारखंडचे जामतारा हे असं गाव आहे ज्या ठिकाणी अमेरिकेची एफबीआय आणि इस्त्रायलच्या मोसादनेही येऊन तपास केल्याचं सांगण्यात येतंय. देशातील असं एकही राज्य नसेल ज्या राज्यातल्या पोलिसांनी जामतारामध्ये अजूनपर्यंत छापेमारी केली नाही. ऑनलाईन फ्रॉडसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाने आपला एक वेगळाच पॅटर्न निर्माण केला आहे. आता कोलकाता शहराच्या शेजारी चालणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश कोलकाता पोलिसांनी केला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल, फेक डेबिट कार्ड्स, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या या छापेमारीत कोलकाता पोलिसांनी 16 आरोपींना अटक केली आहे. 


कोलकाता पोलिसांच्या  Detective Department कडे यासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्यावर मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिसांनी शहराच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यामध्ये 16 आरोपींना अटक केली असून हे सर्व आरोपी जामतारा, गिरिधी, धनबाद या ठिकाणचे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या आरोपींनी कोलकाता शहराच्या आजूबाजूला आपला बस्ता मांडला असून अनेकांची फसवणूक केली आहे. 


 




दिल्ली पोलिसांचीही छापेमारी, नऊ राज्यांत गुन्हे नोंद
दिल्ली पोलिसांनीही 31 ऑगस्ट रोजी मोठी छापेमारी करुन जामतारातील 14 सायबर ठगांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांची ही कारवाई महत्वाची होती कारण त्यामुळे नऊ राज्यांतील सायबर फसवणुकीचे 36 प्रकरणांचा तपासाला गती मिळणार आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत जवळपास दोन कोटी रुपयांची मालमत्ता आणि 20 लाख रुपये जप्त केले आहेत. 


भारतातील जेवढे काही सायबर गुन्हे होतात त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे झारखंडमधील जामताराशी संबंधित असतात. केवळ शालेय शिक्षण घेतलेले या गावातील तरुण हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत आहेत. त्याच्या आधारे ऑनलाईन फ्रॉड केला जातोय. नेटफ्लिक्सने यावर आधारित 'जामतारा-सबका नंबर आएगा' या नावाची वेब सीरिज बनवली आहे.


फिशिंग काय आहे?
फिशिंग म्हणजे युजरनेम, पासवर्ड, क्रेडिट कार्ड डीटेल्स, बँक खात्याचे डीटेल्स यासारखी संवेदनशील माहिती अवैध मार्गानं मिळवणे होय. या मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करुन संबंधिताच्या खात्यावरुन पैसे गायब केले जातात.


बोगस नावाच्या आधारे मोबाईल सीम कार्ड खरेदी केली जातात. त्या आधारे रॅन्डमली कॉल केले जातात. फोनवरच्या व्यक्तीला आपण बँकेतून बोलत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळी आपले एटीएम अथवा अकाउंट ब्लॉक करण्यात आलं असून ते सुरु करण्यासाठी काही एटीएम कार्डची माहिती मागवून घेतली जाते. सोबत ओटीपी नंबरही मागितला जातो. बाजूचा दुसरा एक व्यक्ती मोबाईलवरुन ही सर्व माहिती टाईप करत असतो आणि अवघ्या काही मिनीटातच आपल्या अकाउंटवरचे पैसे एका ई-वॉलेटवर ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर त्या सीमची व्हिल्हेवाट लावण्यात येते. अशा पध्दतीने या परिसरातील तरुण लाखो रुपयांची कमाई करतात आणि मालामाल होताना दिसतात.


संबंधित बातम्या :