रांची: झारखंडमधील संथाल परगणा परिसरातील जामतारा हे गाव, रांचीपासून जवळपास 250 किमी अंतरावर आहे. जामतारा (Jamtara) म्हणजे ऑनलाइन फसवणूक, सायबर क्राईम आणि फिशिंगशी संबंधित लोकांचा अड्डा आहे. जामतारा जिल्ह्यात जवळपास 1,161 गाव आहेत. शेती हेच प्रमुख उत्पन्नाचं साधन असलेल्या या परिसरातील शेती ही मुख्यत: पावसावर अवलंबून आहे.


या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साप आढळतात. संथाळी भाषेत 'जाम' चा अर्थ आहे साप, आणि 'ताडा' किंवा 'तारा' चा अर्थ आहे निवास. त्यामुळेच या जिल्ह्याचं नाव जामतारा असं पडलं आहे. बॉक्साईटच्या खाणींसाठीही हा जिल्हा ओळखला जायचा. पण सध्या या जिल्ह्याची ओळख ही ऑनलाईन ठगांचा जिल्हा अशीच आहे.


काही वर्षापूर्वी अत्यंत मागासलेला जिल्हा अशीच या जिल्ह्याची ओळख होती. लोकांकडे अगदी पडकी मातीची घरं होती. आता या परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रत्येकाकडे अलिशान बंगला, सर्व अत्याधुनिक सुविधा, घरासमोर अलिशान गाडी दिसते. हे सर्व मोबाईल कॉल मुळे झाल्याचं सांगण्यात येतंय.


या परिसराला सायबर ठगांचा अड्डा मानला जातोय. देशातील सर्वाधिक सायबर क्राईम करणारे गुन्हेगार याच परिसरातील असल्याचं सांगण्यात येतंय. देशातील असं कोणतंही राज्य नसेल ज्या राज्याचे पोलिस जामतारा (Jamtara) येथे सायबर गुन्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी आले नसतील. खासकरुन या जिल्ह्यातील करमाटाड हे गाव यासाठी बदनाम आहे.


मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड


या गावातून भारतभर जवळपास शेकडो कॉल केले जातात. त्या माध्यमातून भोळ्या भाबड्याच नव्हे तर अगदी सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या लोकांनाही गंडा घातला जातोय. अनेक लोकांकडून बँक डीटेल्स घेतली जातात आणि क्षणार्धातच त्यांच्या अकाउंटवरुन लाखोंची रक्कम उडवली जाते. बँकेच्या मुख्य शाखेतील मॅनेजर म्हणून संवाद साधत असलेला समोरचा व्यक्ती केवळ दहावी पास असू शकतो. या तरुणांचं शिक्षण अगदीच दहावी पास किंवा नापास इतकंच झालं असतं, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट यांना माहित असते. ऑनलाईन फिशिंगची सर्वाधिक प्रकरणं जामतारातील तरुणांकडून केली जातात.


फिशिंग काय आहे?
फिशिंग म्हणजे युजरनेम, पासवर्ड, क्रेडिट कार्ड डीटेल्स, बँक खात्याचे डीटेल्स यासारखी संवेदनशील माहिती अवैध मार्गानं मिळवणे होय. या मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करुन संबंधिताच्या खात्यावरुन पैसे गायब केले जातात.


सावधान... इन्स्टाग्रामसोबतच बँक अकाऊंटही होवू शकते हॅक! अमिषा पटेलला फटका


बोगस नावाच्या आधारे मोबाईल सीम कार्ड खरेदी केली जातात. त्या आधारे रॅन्डमली कॉल केले जातात. फोनवरच्या व्यक्तीला आपण बँकेतून बोलत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळी आपले एटीएम अथवा अकाउंट ब्लॉक करण्यात आलं असून ते सुरु करण्यासाठी काही एटीएम कार्डची माहिती मागवून घेतली जाते. सोबत ओटीपी नंबरही मागितला जातो. बाजूचा दुसरा एक व्यक्ती मोबाईलवरुन ही सर्व माहिती टाईप करत असतो आणि अवघ्या काही मिनीटातच आपल्या अकाउंटवरचे पैसे एका ई-वॉलेटवर ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर त्या सीमची व्हिल्हेवाट लावण्यात येते. अशा पध्दतीने या परिसरातील तरुण लाखो रुपयांची कमाई करतात आणि मालामाल होताना दिसतात.


गावाच्या बाहेर, कुठेतरी नदीकाठी किंवा आणखी कुठेतरी जाऊन अशा प्रकारचा कॉल केला जातो. एक तरुण दिवसातील असे अनेक कॉल करतो. त्यातून एखादी बकरा सापडला तर त्याच्या खात्यावरचे पैसे उडवले जातात आणि लगेच सिम कार्डाची विल्हेवाट लावली जाते. अशा प्रकारची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांबद्दल अनेक वेळा तक्रारी केल्या जातात. पण फारसं काही हाती लागत नाही. पोलिस गावात येणार असल्याची खबर गुन्हेगारांना आधीच मिळालेली असते. त्यामुळे ते गायब होतात.


गुगल पेच्या कस्टमर केअरमधून बोलतोय सांगून फसवणूक, नांदेडमधील व्यक्तीच्या खात्यातून 2 लाख 62 हजार रुपये लंपास


विशेष म्हणजे या जिल्ह्यातील तरुणांचे शिक्षण फारसे नसताना त्यांच्याकडून हे कृत्य केलं जातं. अनेक तरुण कॉल सेंटरमध्ये काम करणारे असतात किंवा काही काळ त्यांनी कॉल सेंटरमध्ये काम केलं असतं. त्याचा फायदा अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी केला जातो.


या जिल्ह्यातील अनेक तरुण अपडेटेड सॉफ्टवेअरच्या प्रशिक्षणासाठी कोलकाता वा नोएडा या ठिकाणी जातात. या शहरात काही दिवस तंत्रज्ञानातील अपडेट्स शिकल्यानंतर परत आपल्या गावी येऊन लोकांना गंडा घालण्याचं काम करतात. आता तर बोगस ई-सिमचे प्रकारही उघडकीस आले असून त्याचा संबंध थेट जामताराशी लागतोय.


या बोगस ई-सिमच्या माध्यमातून ग्राहकांच्या सर्व डीटेल्स गोळा केल्या जातात. तसेच या नंबरशी लिंक बँक खात्याचीही संपूर्ण माहिती मिळवली जाते आणि त्यातून पैसे गायब केले जातात. नेटफ्लिक्सने यावर आधारित एक वेब सीरिज बनवली आहे.


ऑनलाइन कोविडची लस बुक करत असाल तर सावधान !महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा


काही वर्षापूर्वी या ठगांनी अमिताभ बच्चनच्या खात्यातील पाच लाख रुपये उडवले होते. एवढंच नाही तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी आणि खासदार परणीत कौर यांच्या खात्यातून जवळपास 23 लाख रुपये आणि एका केंद्रीय मंत्र्याच्या खात्यातून दोन लाख रुपये गायब केले होते. या व्यतिरिक्त अशा हजारो लोकांच्या खात्यातून पैसे गायब झाले होते, जे त्यांना परत कधीच मिळाले नाही. ही सर्व प्रकरणे जामताराशी संबंधित आहेत.


यापुढे जर आपल्याला कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने सांगितलं की तो तुमच्या बॅंकेतून बोलत आहे आणि आपल्याकडे एटीएम कार्डच्या डीटेल्सची मागणी करत असेल तर त्याला विचारा की जामतारामधून बोलताय का? भलेही त्याचा रिप्लाय येणार नाही पण ती व्यक्ती जामतारामधूनच बोलत असण्याची शक्यता जास्त आहे.


मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो सांगत भामट्यांकडून शिक्षकाची 10 लाखांना फसवणूक