मुंबई : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होईल.  त्याच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधूमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


सिद्धार्थ शुक्लासोबत बालिका वधू या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्री अविका गौर म्हणते, "सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने आपल्याला जबर धक्का बसला असून अद्याप त्यावर विश्वास बसत नाही. तो एक व्यक्ती म्हणून खूप चांगला होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो."


सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनाने आपल्याला धक्का बसल्याचं अभिनेता रितेश देशमुखने म्हटलं आहे. सिद्धार्थवर लाखो चाहते प्रेम करायचे, त्याच्या आत्म्याला शांती लाभो असंही रितेश देशमुखने म्हटलं आहे. 


 






अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली की, सिद्धार्थ तू कायम स्मरणात राहशील. माझ्या भावना सिद्धार्थच्या कुटुंबासोबत आहेत. 


 






अभिनेता अक्षय कुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, "सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची वाईट बातमी समजली. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो पण अशा प्रकारचा हुशार व्यक्ती आपल्यातून निघून जाणं हे धक्कादायक आहे."


 






सिद्धार्थ शुक्लासोबत अनेक वर्षे काम केलेला त्याचा मित्र मनोज मुंतशीर म्हणतो की, आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्रित काम केलं. इतका मोठा होऊनही त्याला त्याच्या स्टारडमचा गर्व नव्हता, त्याचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. आपण टीव्हीवरील एक मोठं नाव गमावलंय.


बिंदू दारा सिंह म्हणतात की, सिद्धार्थचा मृत्यू ही गोष्ट अजूनही पटत नाही. त्याच्या जाण्याने बॉलिवूडचे मोठं नुकसान झालं आहे. सुनिल ग्रोवरनेही सिद्धार्थच्या अचानक निघून जाण्यानं आपल्याला दु:ख झाल्याचं सांगितलं आहे.


संबंधित बातम्या :