वर्धा : मुलं म्हणजे देवघरची फुलं अशी म्हण आहे. आई वडिलांसाठी मुलं त्यांचं सर्वस्व असतात. पण वर्ध्यात घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. वर्ध्यातील एका वडिलांनी आणि आईनं मिळून चिमुकल्यांना अमानुष मारहाण केली आहे. वर्धा जिल्ह्यात घडलेल्या मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ पसरली आहे. चाईल्ड लाईन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नानंतर या चिमुकल्यांच्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 


साधारणतः दोन दिवसांपूर्वी चाईल्ड लाईनच्या 1098 हेल्पलाईनवर दोन लहान बहिण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्याची तक्रार मिळाली होती. त्यावरून चाईल्डलाईनच्या चमून आर्वी यांनी वर्धा तालुक्यातील गाव गाठलं. त्यानंतर आर्वी यांनी चिमुकल्यांची वडिल आणि सावत्र आईच्या ताब्यातून सोडवणूक करत पोलिसांत तक्रार दाखल केली. आई-वडिलांकडून अमानुष मारहाण होत असलेल्या चिमुकल्यांमध्ये एका 8 वर्षीय आणि 11 वर्षीय बहिण भावंडांचा समावेश आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून या मुलांना सातत्यान मारहाण सुरु होती. त्यांच्या शरीरावरील जखमा त्यांच्यावर सावत्र आई आणि वडिलांकडून करण्यात आलेल्या मारहाणीची अमानुष कहाणी सांगतात. हा प्रकार मारहाणी पुरता थांबला नाही तर चिमुकल्यांना जंगलात सोडण्याचा निर्दयीपणाही या सावत्र आई आणि वडिलांनी केला आहे. या दोन्ही बहिण भावंडांना अनेकदा उपाशी देखील ठेवलं जात असे. वर्ध्यातील पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुलांचे वडील आणि सावत्र आईला अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


दरम्यान, या मुलांचा आई-वडिलांकडून करण्यात येणारा छळ अमानवी असून संताप आणणारा आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात. अशावेळी लहान मुलांचा छळ होत असल्यास सजग राहून वेळीच आळा घालण्याची गरज आहे. मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :