मुंबई : राज्यात आज कृषी दिवस साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 


देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचं मोठं योगदान आहे. त्यांना राज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिलं. 


 






वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. राज्यात 1972 साली ज्यावेळी दुष्काळाचं संकट आलं होतं त्यावेळी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या. त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध करून दिली, जलसंधारणाची कामं वाढवली आणि शेतीला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. नंतरच्या काळात त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं.


महत्वाच्या बातम्या :