अमरावती : अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळी, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हा प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यासोबत इतरही दिंड्यांना स्थान प्राप्त करून दिले तर विदर्भामध्ये आई रुक्मिणी मातेने सर्व संतांना पदरात घेऊन आपल्या सोबत आषाढी वारीला पंढरपूरला नेऊन सर्व संतांची वारी घडवून आणल्यामुळे हा एक ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो, असं मत विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केलं आहे. 


आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत आणि त्यामध्ये विदर्भातील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. पण विदर्भामधून इतरही काही गेल्या शेकडो वर्षाची पायी जाण्याची परंपरा जोपासत आहेत. म्हणून इतरही दिंड्यांना वाहनाने का होईना, पण आषाढी वारीमध्ये सहभागी होता यावे याकरिता विश्व वारकरी सेनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना विनंती करून प्रशासकीय मीटिंग लावण्यात आली होती. आणि त्या मीटिंगमध्ये आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर संस्थान यांच्या पालखी सोहळ्यासोबत इतर प्रत्येक दिंडीतील किमान एक वारकरी विणेकरी स्वरूपात सहभागी करून घ्यावा ही विनंती करण्यात आली होती. आणि वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून विदर्भातील इतरही दिंड्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते.


विदर्भातील बऱ्याच दिंड्यांचे प्रतिनिधी विश्व वारकरी सेनेच्या संपर्कात असून वेळोवेळी आषाढी वारीमध्ये आम्हाला संधी मिळेल की, नाही अशी विचारणा करत असल्यामुळे आज पालकमंत्री यशोमती ठाकूर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, जिल्हाधिकारी अमरावती यांना स्मरण पत्र पाठवण्यात आलेला आहे. या निवेदनाद्वारे नम्र विनंती केल्या गेली की, विठ्ठल रुक्मिणी समिती कौंडण्यपूर, जिल्हाधिकारी अमरावती आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समन्वयाची भूमिका घेऊन कौंडण्यपूर समितीच्यावतीने वीस वारकरी, किमान 15 दिंडीचे प्रत्येकी एक पंधरा प्रतिनिधी विणेकरी स्वरूपात आणि पाच वारकरी संघटनांचे पाच प्रतिनिधी असे एकूण 40 वारकरी आषाढी वारीमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, ही विनंती करण्यात आलेली आहे.


जर आई रुक्मिणी मातेच्या सोबत इतर संतांच्या पादुका पंढरपूरला गेल्या तर महाराष्ट्रामधून हा एक ऐतिहासिक सोहळा निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने केलेली ही विनंती कौंडण्यपूर संस्थान, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने मान्य करावी अशी विनंती ह.भ.प. गणेश महाराज शेटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashadhi Wari 2021 : संत तुकोबा आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज प्रातिनिधिक प्रस्थान