अकोला : अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर तालूक्यातील समशेरपूर येथे प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड घडलं आहे. हत्याकांडात प्रियकर धम्मपाल उर्फ संदेश आटोटे याची चाकू आणि कोयत्याने हत्या करण्यात आली आहे. तर मुलीच्या वडिलांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मुलीचे वडील दिपकराज यांनी प्रियकर धम्मपाल याच्यावर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर धम्मपालच्या हत्येनंतर नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात मुलीचे वडील दिपकराज गंभीर जखमी झाले होते. त्यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


मृत प्रियकर धम्मपाल औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी आघाडीचा सक्रीय पदाधिकारी होता. तर मुलीचे मृत वडील दिपकराज डोंगरे अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. धम्मपाल उर्फ संदेश याचं दिपकराज यांच्या मुलीवर प्रेम होतं. मुलीचे वडील दिपकराज यांचा या प्रेमाला विरोध होता. औरंगाबाद येथे राहत असलेला धम्मपाल दोन दिवसांपूर्वी आपल्या नात्यातील लग्नासाठी समशेरपूर या आपल्या मूळगावी आला होता. या हल्यात मृत प्रियकराचा भाऊही गंभीर जखमी झाला. यात दोन्ही बाजूंनी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण : 
अकोला जिल्हा आज हत्येच्या एका घटनेनं पार हादरून गेलं आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रियकर अन् मुलीच्या वडिलांचा समावेश आहे. मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे 35 वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली. धम्मपाल आटोटे असं मृत प्रियकराचे नाव आहे. तर दिपकराज डोंगरे असं मुलीचे वडील असलेल्या दुसऱ्या मृताचे नाव आहे. 
   
धम्मपाल उर्फ आदेश आटोटे हा औरंगाबाद येथे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून परीचीत होता. मुर्तिजापूर तालूक्यातील समशेरपूर हे धम्मपाल याचं मुळगाव आहे. त्याचं मुर्तिजापूर येथील दिपकराज डोंगरे यांच्या मुलीवर प्रेम होतं. मात्र, दिपकराज यांचा या प्रेमाला विरोध होता. धम्मपाल हा काल 29 जूनला भाच्याच्या लग्नासाठी गावी आला होता. आज सकाळी दिपकराज डोंगरे यांनी धम्मपाल याला जाब विचारण्यासाठी समशेरपूर गाठले. यादरम्यान धम्मपाल आणि दिपकराज यांच्यात जोरदार वाद झालेत. यात दिपकराज यांनी धम्मपालच्या पोटावर चाकूने आणि कोयत्याने वार केले. त्यात धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृताचा मोठा भाऊ हा वाद सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला. 


नातेवाईकांच्या मारहाणीत गंभीर जखमी मुलीच्या वडिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू : 
दिपकराज डोंगरेच्या हल्ल्यात धम्मपालचा जागीच मृत्यू झाल्याने नातेवाईक प्रचंड संतप्त झाले. यानंतर नातेवाईकांनी दिपकराज यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात दिपकराज गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात जखमी दिपकराज यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. या घटनेत गंभीर जखमी दिपकराज यांना अकोल्याला उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र, दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


दोन्ही कुटुंब वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते :
यातील आरोपी दिपकराज डोंगरे हा केंद्र प्रमुख असून अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. तसेच प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा संचालक आहे. मृत प्रियकर धम्मपाल औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी आघाडीचा सक्रीय पदाधिकारी होता. तो विद्यार्थी आघाडीच्या सांस्कृतिक विभागाचा प्रमुख म्हणून काम बघत होता. 


दोन्ही बाजूंचे आरोपी वाढण्याची शक्यता :
दिपकराज समशेरपूला गेला तेव्हा त्याच्यासोबत आणखी काही लोक असल्याचं बोललं जात आहे. तर दिपकराज याने धम्मपालची हत्या केल्यानंतर त्याच्यावर धम्मपालच्या नातेवाईकांनीही हल्ला चढविला. याचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. यात दोन्ही बाजूंनी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. यात आता मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.