मुंबई : मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या गोळीबार करुन दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यात ज्वेलर्स मालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करुन तिघेही आरोपी पसार झाले असून त्यापैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 


आज (30 जून) सकाळच्या सुमारास मुंबईतील दहिसर येथील गावडे परिसरात ओम साईराज ज्वेलर्स या ज्वेलर्समध्ये तीन तरुण सोनं घेण्याच्या बहाण्याने अॅक्टिवा बाईकवरुन आले आणि या तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स लुटायला सुरुवात केली. मात्र या तिघांना ज्वेलर्सचा मालक शैलेंद्र पांडे (वय 45) याने कडाडून विरोध केला. ज्वेलर्स मालक जोरदार विरोध करतोय यामुळे आपल्याला दरोडा टाकता येणार नाही, तर आपण पकडले देखील जाऊ अशी भीती दरोडेखोरांना सतावल्याने त्यांनी ज्वेलर्स मालक शैलेंद्र पांडे याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत शैलेंद्र पांडे यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे दहिसर भागात एकच खळबळ उडाली आहे. 


मुंबईत अशी फिल्मी स्टाईल दरोड्याची घटना घडणे हे मुंबईला अशोभनीय आहे. ही घटना घडताच अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेण्याकरता विविध सीसीटीवी फुटेजचा, तसाच विविध प्रकारचा तपास केला जातोय. या तिन्ही दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या हाती लागली असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघेही स्पष्ट दिसून येत आहेत.


एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर ट्रिपल सीट बसून हे दरोडेखोर आले होते आणि ज्वेलर्सवर दरोडा टाकल्यानंतर ज्वेलर्स मालकाची हत्या करुन याच काळया रंगाच्या दुचाकीवर बसून ते तिघेही फरार झालेले आहेत. सध्या मुंबई गुन्हे शाखा आणि दहिसर पोलिसांनी सीसीटीवी फुटेजच्या माध्यमातून एका आरोपीला ताब्यात घेतला आहे. त्याच्या आणखी दोन साथीदाराचा शोध देखील पोलीस घेत आहेत. 


महत्वाच्या बातम्या :