गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
पोस्टे अहेरी हद्दीतील मौजा आल्लापल्ली येथे एक इसम नामे योगेश अरुणसिंग चव्हाण हा देशी विदेशी दारुची अवैध दारु विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली होती.
गडचिरोली : विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारुविक्री व दारुच्या बाटल्यांची वाहतूक केली जाते. त्याविरुध्द अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी (Police) जिल्ह्यात धाडसत्र सुरू केलंय. विशेष म्हणजे कालच गडचिरोली पोलिसांनी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा मद्यसाठा बुलडोझरखाली नष्ट केला होता. त्यानंतर, पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अवैध दारुसह (Liquor) ज्या वाहनांतून ही दारू वाहतूक करण्यात येत होती, ते दोन्ही वाहनेही जप्त केली आहेत.
पोस्टे अहेरी हद्दीतील मौजा आल्लापल्ली येथे एक इसम नामे योगेश अरुणसिंग चव्हाण हा देशी विदेशी दारुची अवैध दारु विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली होती. अहेरी पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच आरोपी योगेश चव्हाणच्या घरासमोरील अंगणात मारुती सुझुकी कंपनीचे वाहन क्र. एम.एच. 34 ए.एम. 8549 होते, या चारचाकी वाहनात एकूण 4,57,200/- रुपयांचा दारुच्या पेट्यांनी भरलेला मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
आलापल्ली येथील दोन इसम चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस पथकाद्वारे मौजा आलापल्ली परिसरात वाहणाची पाहणी करित असतांना दोन इसम संशयास्पद हालचाल करतांना दिसून आले. त्यावेळी, दोघांची विचारपूस करण्यासाठी पोलीस त्यांच्याजवळ जात असताना सदर दोन्ही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे, पोलिसांनी वाहनाजवळ धाव घेऊन दोघांनाही जागीच पकडले. त्यानंतर त्यांची विचारपूस केली असता, अवैध दारुची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे 1) गुड्डु वर्मा, रा.चंद्रपूर आणि 2) अरविंद हिरामण भांडेकर, रा. येवला तह. जि. गडचिरोली अशी आहेत.आरोपींकडे टाटा कंपनीची इंडीका विस्टा पांढऱ्यां रंगाची चारचाकी वाहन क्र.एम.एच 32 सी.6050 आणि टर्बो कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एम.एच 24 जे. 9564 आढळून आले. त्यामुळे, दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, वाहनामध्ये देशी विदेशी कंपनीची अवैध दारु मिळून आल्याने वाहनासह एकूण किंमत 15,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, सदर मुद्देमाल किशोर डांगरे रा. आलापल्ली याचा असून सुलतान शेख रा. चंद्रपुर हा त्याचा पार्टनर असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, वरीलप्रमाणे एकूण 20,55,200/- (अक्षरी - वीस लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये) रुपयांचा अवैध मुद्देमाल विनापरवाना विक्रीकरीता वाहतूक करतांना आढळून आल्याने वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींविरुध्द पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
हेही वाचा
सिनेस्टाईल भुगा... बुलडोझर खाली चिरडल्या 1 कोटी 35 लाखांच्या दारू बाटल्या, पोलीस कारवाई व्हायरल