Mumbra: व्यापाऱ्याकडून उकळले सहा कोटी रुपये, आरोप पोलिसांवर गुन्हा कधी दाखल होणार?
Crime News: मुंब्रा येथील एका व्यापाऱ्याकडून पोलिसांनीच तब्बल सहा कोटी रुपये उकळल्याच्या प्रकारामध्ये आज विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Crime News: मुंब्रा येथील एका व्यापाऱ्याकडून पोलिसांनीच तब्बल सहा कोटी रुपये उकळल्याच्या प्रकारामध्ये आज विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात अजूनपर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी तक्रारदारच नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात येत आहे.
मुंब्रा पोलीस स्थानकातील पोलिसांनी एका व्यापार्याच्या घरी छापा टाकून तीस कोटी रुपये जप्त केले. मात्र यात काही कोटींची सेटलमेंट करून सहा कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात निलंबित झालेल्या सगळ्या पोलिसांसोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आज निलंबन झालेल्या पोलिसांची जबाब नोंदवण्यात आले.
मात्र यामध्ये प्रश्न असा उरतो की केवळ विभागीय चौकशी करून सत्य समोर येणार का? ही विभागीय चौकशी पोलीस आपल्या माणसांना वाचवण्यासाठीच करत आहेत. असाही आरोप पोलिसांवर केला जात आहे. मोठी कारवाई होऊ नये यासाठीच पोलिसांचे निलंबन करण्यात आले, अशीही चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. खरे तर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो. कायदेतज्ञ बी एल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी कलम 166, 217 तसेच 409 आणि 383 अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र तसे न करता केवळ विभागीय चौकशी केली जात आहे.
याबाबत ठाणे पोलीस दलातून कोणताही अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाही. मात्र याच प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने याबाबत खुलासा करून सांगितले. यात जोपर्यंत वायरल झालेल्या पत्रातील तक्रारदार किंवा ज्याचे पैसे आहेत तो व्यापारी स्वतः तक्रार देत नाही, तोपर्यंत आम्ही गुन्हा नोंदवू शकत नाही. जर विभागीय चौकशीमध्ये हे पोलिस दोषी आढळले, तर मात्र आम्ही गुन्हा नोंदवू. मात्र ही विभागीय चौकशी कधी संपेल याचा नेम कुणालाच नाही. तसेच आजपर्यंत झालेल्या अशा विविध चौकशीमध्ये पुढे काहीच निष्पन्न होत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळेच विभागीय चौकशी ऐवजी थेट गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.