Delhi Kanjhawala Accident Case : दिल्लीतील कंझावाला प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येत आहे. कंझावाला येथे तरुणांनी गाडीने एका तरुणीला फरफटत नेते होते. या अपघातात तरुणी अंजली सिंहचा (Anjali Singh) मृत्यू झाला. शनिवारी या प्रकरणाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मृत अंजली सिंहची मैत्रिण निधी (Nidhi) हिच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निधीला यापूर्वी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडले जाणून घ्या.


काय आहे नेमकं प्रकरण?


मद्यधुंद अवस्थेत असलेले पाच आरोपी कारमधून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जात होते. त्यांच्या कारखाली येऊन एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीत खळबळ पसरली आहे. ही घटना सुलतानपुरी येथील आहे. कार आणि स्कूटीची धडक झाल्यानंतर तरुणी गाडीखाली आली आणि कारने तिला कांजवालापर्यंत फरफटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की यावेळी मुलीचे सर्व कपडे फाटले. पोलिसांना तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना एवढा मोठा अपघात झाल्याचेही कळले नाही, असे आरोपींनी सांगितले आहे.


कंझावाला प्रकरणातील 10 महत्त्वाचे मुद्दे


1. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरनुसार, मृत अंजलीची मैत्रिण निधी हिला आग्रा येथे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. निधी सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. निधीला 6 डिसेंबर 2020 रोजी आग्रा रेल्वे स्थानकावर तेलंगणातून गांजा (ड्रग्ज) आणल्याबद्दल ताब्यात घेण्यात आली. नंतर तिला अटक करण्यात आली. निधीसोबत समीर आणि रवी नावाच्या दोन मुलांनाही अटक करण्यात आली होती.


2. आग्रा जीआरपीचे एसपी मोहम्मद मुश्ताक यांनी सांगितले की, डिसेंबर 2020 मध्ये गांजा तस्करांविरुद्धच्या कारवाईदरम्यान तीन जणांना अटक करण्यात आली होती. 30 किलो गांजा जप्त करण्यात आला. अटक केलेल्या तिघांपैकी एक निधी ही सुलतानपुरीची रहिवासी होती. याचा कंझावाला प्रकरणाशी संबंधित आहे की, याबाबत तपास सुरु आहे.


3. मृत अंजलीच्या मावशी सांगितले की, "निधीला अंमली पदार्थ प्रकरणात अटक झाल्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. आमच्या घरातही या गोष्टीचा उल्लेख कधीच झाला नाही. अंजलीने दारूचे सेवन केले नाही, पोस्टमार्टममध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. तिचं कुणाशी भांडण सुरु होतं, याबद्दलही आम्हाला काही माहिती नाही. याआधी अंजलीचा अपघात झाला होता, नंतर ती बरी झाली. पंजाबी बागेत अपघात झाला होता. आमच्या अंजलीसोबत जे काही झालं हा सगळा कट आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी."


4. कंझावाला प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, निधीला तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे आणि तिला अटक करण्यात आलेली नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "प्रत्यक्षदर्शी निधी हिला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी तिला तपासात चौकशीसाठी बोलावले. तिला अटक केलेली नाही."


5. अंजली सिंहचा अपघात झाला त्यावेळी निधी तिच्यासोबत होती. निधीने मीडियाला सांगितले होते की, दुर्घटनेच्या दिवशी अंजली नशेत होती. निधीने प्रतिक्रिया देत सांगितले होते की, "अंजली मद्यधुंद अवस्थेत होती, पण तिने स्कूटी चालवण्याचा हट्ट धरला. कारने तिला धडक दिल्यानंतर ती गाडीखाली आली आणि कारसोबत फरफटत ओढली गेली. मी घाबरले आणि पळत घरी आले, मग कोणालाही, काहीही सांगितले नाही."


6. कंझावाला प्रकरणातील आरोपींचा कथित बचाव करणाऱ्या अंकुश खन्ना याला दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला आहे. महानगर दंडाधिकारी सान्या दलाल यांनी शुक्रवारी सरेंडर झालेल्या अंकुश खन्नाला जामीन मंजूर केला आणि त्यांच्यावरील आरोप जामीनपात्र असल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अंकुश खन्नाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपी दीपक वाहन चालवत असल्याचे सांगितले होते. पण, आतापर्यंतच्या तपासात आरोपी अमित हाच वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


7. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णा (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांना अटक केली होती. त्यानंतर आशुतोष आणि अंकुश खन्नाला अटक करण्यात आली.


8. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी यूपीमध्ये निधीविरोधात दाखल केलेल्या गांजा तस्करीच्या एफआयआरमध्ये निधीने पोलिसांना सांगितले की ती दीपक नावाच्या व्यक्तीसोबत काम करत होती. ती दीपकसाठी गांजाची तस्करी करायची. अंजलीच्या हत्येचा आरोप करत त्यांनी दीपक आरोपी असल्याचे म्हटले आहे. निधीला अंजलीच्या मारेकऱ्यांची माहिती होती का? आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे.


9. दरम्यान, शाहरुख खानच्या 'मीर फाउंडेशन'ने अंजलीच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. एका विश्वसनीय सूत्राने एबीपीला दिलेल्या माहितीनुसार, 'मीर फाउंडेशन'ने कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे, परंतु मदतीची रक्कम उघड केलेली नाही. शाहरुख खानचे 'मीर फाउंडेशन', त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्या नावावर आहे. ही संस्था इतर सामाजिक कार्यांव्यतिरिक्त, अॅसिड हल्ल्यातील पीडितांना मोठ्या प्रमाणावर मदत आणि उपचार करण्यास मदत करते.


10. 1 जानेवारी रोजी सकाळी 20 वर्षीय अंजली सिंहच्या स्कूटीला कारने धडक दिली आणि मुलीला सुलतानपुरी ते कांझावाला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Delhi Girl Drag Case : "हा अपघात नाही, आधी अत्याचार मग हत्या"; पीडितेच्या आईचा आरोप