Delhi Girl Dragged to Death : दिल्लीमध्ये (Delhi) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणीला सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाने फरफटत नेले. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. तरुणीवर अत्याचार करून त्यानंतर मुलीची हत्या करण्यात आली आणि या घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मृत तरुणीच्या आईने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका कारने तरुणीच्या स्कूटीला टक्कर दिल्याने तिचा अपघात झाला, त्यानंतर ती कारच्या चाकामध्ये अडकली आणि कारने तिला सुमारे आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अशी माहिती समोर येत आहे.
पाच आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत
मद्यधुंद अवस्थेत असलेले पाच आरोपी कारमधून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जात होते. त्यांच्या कारखाली येऊन एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीत खळबळ पसरली आहे. ही घटना सुलतानपुरी येथील आहे. कार आणि स्कूटीची धडक झाल्यानंतर तरुणी गाडीखाली आली आणि कारने तिला कंझावालापर्यंत फरफटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की यावेळी मुलीचे सर्व कपडे फाटले. पोलिसांना तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना एवढा मोठा अपघात झाल्याचेही कळले नाही, असे आरोपींनी सांगितले आहे.
'हा अपघात नाही, अत्याचारानंतर मुलीची हत्या'
एबीपी न्यूजने मृत मुलीच्या आईशी संवाद साधला. त्यावेळी आईने सांगितले की, तिची मुलगी घरात एकटीच कमावती होती आणि इव्हेंट मॅनेजमेंट करायची. कामासाठी पंजाबी बाग येथे जात असल्याचे आईला सांगून ती घरातून बाहेर पडली होती. याशिवाय तरुणीने अधिक काही सांगितले नव्हते. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ती घरातून बाहेर पडली. रात्री 9 वाजता आईने तिला फोन केला पण तिचा फोन लागला नाही. रात्री 11 वाजून गेले तरी तिचा फोन सुद्धा आला नाही. यानंतर सकाळी फोन आल्यावर कळले की मुलीचा अपघात झाला आहे. पीडितेच्या आईने सांगितले आहे की, तिला तिच्या मुलीलाही शेवटचे बघू दिले गेले नाही.
दरम्यान, मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 'सकाळी 10 वाजता घरी फोन आला की, मुलीचा अपघात झाला आहे. ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा तेथे दोन मुलांना अटक करण्यात आली होती. घरात ती एकटीच कमावणारी होती, दुसरी कोणी नाही.'