Crime News : पत्नीला घेण्यास गेला आणि पिटाळून लावलं, सासरच्या छळाला कंटाळून कंडक्टरचं टोकाचं पाऊल; पत्नीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Crime News : प्रेमविवाह केलेल्या मुलीला सासरचे मंडळी घेवून गेले. तरुण मुलीला भेटण्यसाठी गेला. मात्र त्याला सासरच्यांनी विरोध केला होता.

Crime News : प्रेमविवाह (Love marriage) केलेल्या मुलीला सासरचे मंडळी घेवून गेले. तरुण मुलीला भेटण्यसाठी गेला. मात्र त्याला सासरच्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून संदीप भिमराव निकम (28, रा. हातगाव, ता. चाळीसगाव) या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हातगाव येथील संदीप निकम हा नाशिक येथे सिटी लिंकमध्ये कंडक्टर म्हणून नोकरीस होता. त्याठिकाणी त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी नाशिक येथे प्रेमविवाह केला होता. त्यानंतर संदीप हा पत्नीला घेवून आपल्या मूळगावी आला होता. दि. ८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीचे आई, वडील, भाऊ व काकांसह चार ते पाच जण हातगाव येथे आले होते.
...तर तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही
त्यांनी दोघांचे लग्न थाटामाटात लग्न लावून देतो असे सांगत तरुणीला सोबत घेवून जातो असे सांगितले. मात्र त्या तरुणीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी तरुणीच्या कुटुंबियांनी आमच्यासोबत नाही आली तर तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. यावेळी मुलीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रारही दिली होती.
पत्नीला घेण्यास गेला अन् पिटाळून लावले
संदीप हा पत्नीला घेण्यासाठी नाशिक येथे गेला. मात्र तेथे तिच्या कुटुंबियांनी भेटू न देता त्याला शिवीगाळ करीत पिटाळून लावले होते. त्यामुळे संदीप हा मानसिक तणावात होता. सासरच्यांनी दिलेल्या त्रासामुळे संदीप हा खचून गेला होता, त्यामुळे त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी मिथून भिमराव निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळदे मळा, बेलदगव्हाण, देवळाली कॅम्प येथील मुलीचे आई-वडील, भाऊ व मुलगी अशा पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घर रिकामे करण्यावरून महिलेस मारहाण
घर खाली करण्याच्या कारणावरुन महिलेला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पती, पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पार्वतीनगरात 29 वर्षीय महिला राहते. या महिलेच्या खालच्या घरात भाडेकरू राहतात. गत 3 ते 4 महिन्यापासून भाडेकरून पती-पत्नीने फिर्यादी महिलेस अवमानकारक वक्तव्य केले. दरम्यान, घरमालक महिलेने भाडेकरूंना घर खाली करून द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने फिर्यादी महिलेस मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून हेमराज पाटील व त्यांच्या पत्नीविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























