Crime: होमवर्कपासून वाचण्यासाठी सहावीच्या पोराचा प्रताप वाचून डोक्यावर हात मारुन घ्याल! पठ्ठ्यानं स्वत:च्या किडनॅपिंगचा प्लॅन रचला अन्...
Chhindwara News: : होमवर्कपासून वाचण्यासाठी एका सहावीच्या मुलानं केलेला प्रताप पाहून आपणही डोक्यावर हात मारुन घ्याल...
Chhindwara News: आजकालची मुलं इतकी हुशार झाली आहेत, ज्याचा अंदाजही लावता येत नाही. पण कधी कधी ही हुशारी अनेकांसाठी त्रासदायक ठरते. आता हेच पाहा की, एका सहावीच्या मुलानं होमवर्कपासून वाचण्यासाठी स्वत:च्याच किडनॅपिंगचा प्लॅन केला. यानंतर पालकांसह पोलिसांची जी तारांबळ उडाली ती वेगळीच. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे सहाव्या वर्गातील मुलाने गृहपाठ टाळण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाची खोटी कहाणी रचली. एवढेच नाही तर तो स्वत: ट्रेनमध्ये चढून जुन्नरदेवहून छिंदवाडा गाठलं.
तब्बल 4 तास त्याचं कुटुंबीय आणि पोलिस कर्मचारी चिंतेत होते, मात्र नंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं अन् कुटुंबीय आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इथल्या जुन्नरदेवच्या अरविंद शाळेत शिकणारा 12 वर्षीय मोहम्मद अनिस हा विद्यार्थी 2 दिवसांपूर्वी अचानक त्याच्या शाळेतून बेपत्ता झाला. तो ट्रेनमध्ये चढल्यानंतर छिंदवाडा रेल्वे स्टेशनवर पोहोचला. यादरम्यान त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तिनं त्याला येथे रेल्वे स्थानकावर एकटे पाहिले असता त्याने त्याला इथं येण्याबाबत विचारणा केली. यानंतर, त्याने अपहरण झाल्याची खोटी कहाणी सांगितली. त्यानं सांगितले की दोन मास्क घातलेल्या लोक त्याचे अपहरण करत होते आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो पळून गेला आणि ट्रेनमध्ये बसून छिंदवाडा येथे आला.
त्या व्यक्तिनं ही सत्य घटना समजून तात्काळ जीआरपी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर जीआरपीने जुन्नरदेव पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबीयांना छिंदवाडा तिथं बोलावलं आणि बालकाला त्यांच्या ताब्यात दिले. मुलाने सांगितले की तो शाळेतील टॉयलेटमध्ये गेला होता, तिथे दोन मास्क घातलेल्या लोकांनी त्याचे अपहरण केले आणि जबरदस्तीने त्याला बैतूलच्या दिशेने ट्रेनमध्ये नेले. त्यानंतर अचानक तो चकमा देत पळून गेला आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून छिंदवाडा गाठलं.
पोलिस अधिकारी ब्रिजेश मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांनी तात्काळ शाळेत पोहोचून चौकशी केली, नंतर त्यांनी रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तो ट्रेनमध्ये एकटाच बसलेला दिसला, त्यानंतर त्या मुलाचे पितळ उघडं पडलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने गृहपाठ केला नव्हता, शाळेत शिक्षक त्याला मारतील किंवा रागावतील अशी भीती होती, त्यामुळे तो अचानक शाळेतून पळून गेला आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर ट्रेनमध्ये चढला आणि त्यानं सरळ छिंदवाडा गाठलं.
ही बातमी देखील वाचा