पुन्हा एक निर्दयी आफताब! प्रेयसीला संपवलं, 200 किलोमीटर दूर जंगलात पेट्रोल टाकून फेकलं
Chhattisgarh News: छत्तीसगडमध्येही श्रद्धा हत्याकांडसारखं प्रकरण समोर. येथे एका तरुणानं तरुणीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Chhattisgarh News: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानं (Shraddha Walker Murder Case) अवघा देश हादरला. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं तिची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तब्बल 37 तुकडे केले. आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अशातच आता श्रद्धा हत्याकांडासारखंच एक प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगढमध्ये (Chhattisgarh) एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची रायपूरपासून 200 किलोमीटर दूर नेत ओरिसामध्ये तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या
तनु कुर्रे ही कोरबा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती रायपूरमधील एका खासगी बँकेत नोकरीला होती. दरम्यान, त्याची ओळख बालनगीर येथील व्यावसायिक सचिन अग्रवाल याच्याशी झाली. दोघांमधील ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण ज्याच्यावर प्रेम करतेय तोच आपली हत्या करेल, हे तनूला माहीत नव्हतं. 21 नोव्हेंबर रोजी तनूचा फोन बंद असल्यानं कुटुंबीय तिच्याशी बोलू शकले नाहीत. घाबरलेल्या नातेवाईकांनी रायपूर गाठलं आणि येथील पंडरी पोलीस ठाण्यात तनू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
हत्येनंतर केला तनू जीवंत असल्याचा बनाव
खास गोष्ट म्हणजे, तनू पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतरही सचिन तनूच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. तनू आणि त्याचे लवकरच लग्न होईल, असं आश्वासन तो घरच्यांना देत राहिला. त्याचा स्क्रिनशॉटही त्यानं कुटुंबीयांना दाखवला, जेणेकरून कुटुंबीयांना तनू जिवंत आहे, असं वाटेल. मात्र सत्य काहीतरी वेगळंच होतं.
सचिनने तनूला गोळ्या घालून ठार केलं आणि तनूचा मृतदेह बालंगीरच्या जंगलात पेट्रोल टाकून फेकून दिला. त्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटू शकली नाही. येथे ओदिशा पोलिसांना तनुचा मृतदेह मिळाला. ओरिसा पोलिसांनी रायपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली.
रायपूर पोलिसांनी केला खुलासा
रायपूरचे एसएसपी प्रशांत अग्रवाल यांनी खून प्रकरणावर एबीपी न्यूजला सांगितलं की, "तरुण आणि तरुणी एकमेकांना आधीच ओळखत होते. काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी पंडरी पोलीस ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. चौकशीत तरुण आणि तरुणी एकत्र ओदिशात गेल्याचं निष्पन्न झालं. ओदिशात तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्यानं तरुणानं तिची हत्या केली. पोलिसांनी तरुणाची चौकशी केली असता, तरुणीचे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचं त्याला कळालं होतं. त्याच रागातून तरुणानं त्याच्या प्रेयसीची हत्या केली. ओदिशातील बालंगीर येथे मुलीचा मृतदेह सापडला असून आरोपीला ओदिशा पोलिसांनी अटक केली आहे.