क्रीडा संकुल घोटाळ्यात हर्षकुमारच्या मैत्रिणीची झाडाझडती, अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता, आज न्यायालयात करणार हजर
अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पिताला देखील या घोटाळ्याचा भागीदार केले होते.अर्पिताच्या नावानेच दीड कोटी रुपयांचा ल क्झरियस फ्लॅट खरेदी केला होता.
Chhatrapati Sambhajinagar: राज्यभर गाजत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील 21.59 कोटींचा घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीची रविवारी दिवसभर पोलिस आयुक्तालयात झाडाझडती घेण्यात आली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशी केल्यानंतर आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्पिताच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात. हर्षकुमारच्या बाबतीत तिला बहुतांश माहिती असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. तिची पोलिस कोठडीची मुदत आज पूर्ण होत असल्यामुळे तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली.
हर्षकुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत तिच्याकडून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पिताला देखील या घोटाळ्याचा भागीदार केले होते. विमानतळासमोरील उच्चभ्रू सोसायटीमध्ये अर्पिताच्या नावानेच दीड कोटी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता. महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना ते दोघे हजर होते आणि हा फ्लॅट रोखीने विकत द्यावा, अशी गळ हे मंडळी बिल्डरला घालत असल्याचं पुढे आलेला आहे.उरविवारी पोलिस आयुक्तालयात क्रीडा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलग सातव्या दिवशी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. यासोबतच इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
बनावट स्वाक्षरीचा वापर करत 21.59 कोटींचा घोटाळा
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यात हर्षकुमार क्षीरसागर याने पोलिसांना सात पानांचे पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. उपसंचालकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या कडून हे सगळं करून घेतलं, सगळी संपत्ती मी संजय सबनीस यांच्या धमकीमुळे माझ्या नावावर घेतली. ही संपत्ती विकून सगळे पैसे वसूल करावे आणि सबनीस याना अटक करावी, अशी मागणी हर्षकुमार याने केली आहे. हे पत्र त्यांनी पोस्टाद्वारे पोलिसांना पाठवला आहे.