Chhatrapati Sambhajinagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, जिल्हा परिषद शाळेसमोरच सुरु होते नको ते प्रकार, दोन बहिणींना बेड्या, मुख्य नर्स फरार
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सातारा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरालगतच्या सातारा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) अगदी समोरच बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एका टोळीचा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. या कारवाईत दोन सख्ख्या बहिणींसह रुग्णाच्या पतीला रंगेहाथ पकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, या रॅकेटची मुख्य सूत्रधार असलेली नर्स अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील परिसरात बेकायदेशीर गर्भपात केला जाणार असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली होती. एका 23 वर्षीय विवाहित महिलेला गर्भपातासाठी तिची नणंद आणि नवरा घेऊन आले होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पथकाने छापा टाकला आणि या रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी दोन महिला (ज्या सख्ख्या बहिणी आहेत) आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: 15 हजारांत जीवघेणा खेळ; पोर्टेबल मशीनचा वापर
तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटची मास्टरमाइंड ज्योती भीमराव पवार ही असून ती स्वतः एक जीएनएम (GNM) नर्स आहे. अवघ्या 15 हजार रुपयांसाठी पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी केली जात होती. जर गर्भ मुलीचा असेल, तर गोळ्या देऊन गर्भपात केला जायचा. महिलेची प्रकृती किंवा परिस्थितीनुसार तिला दुसऱ्या ठिकाणी पाठवून लाखो रुपये उकळले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: मास्टरमाइंड नर्स फरार
छापा पडल्याचे लक्षात येताच मुख्य सूत्रधार ज्योती पवार हिने पोलिसांना गुंगारा देऊन तिथून पळ काढला. ती सध्या फरार असून पोलीस तिचे धागेदोरे शोधत आहेत. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शाळेसारख्या पवित्र वास्तूच्या समोरच असे घृणास्पद कृत्य चालत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हे रॅकेट किती काळापासून सक्रिय होते आणि यात आणखी कोणत्या मोठ्या डॉक्टरांचा किंवा रुग्णालयांचा समावेश आहे का? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
Before You Go
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!























