Shirdi News : शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्री, कंत्राटी कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार, गुन्हा दाखल
Shirdi Sai Baba Mandir : शिर्डी साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirdi News : शिर्डीत (Shirdi Sai Baba Mandir) दररोज हजारो भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तर अनेक जण शिर्डीत पेड दर्शन घेतात. मात्र या दर्शन पासमध्ये फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याने बनावट दर्शन पास विक्री केल्याचे उघड झाले असून या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. प्रकाशाने विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यानेच बनावट दर्शन पास बनवले. साई संस्थानच्या चार नंबर प्रवेशद्वारावर संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय येताच आरोपी कर्मचाऱ्याने पास फाडल्याने त्याचं बिंग फुटलं. साई संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून मुंबईच्या बेटर कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचा कंत्राटी डीटीपी ऑपरेटर सागर रमेश आव्हाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पास विक्रीचा गोरख धंदा अनेक दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पेड दर्शनपास देऊन फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार घडत असल्याने साईबाबा मंदिर संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले करण्यात आले होते. यामुळे जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे, त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील बनावट पास तयार करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
31 डिसेंबरच्या रात्री साई मंदिर दर्शनासाठी खुले
2024 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येणार असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा 31 डिसेंबर रोजी रात्री साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानने दिली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद
तर, त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. नाताळातील सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राज शिष्टाचारासंबंधित अतिमहत्त्वाचे व्यक्ती वगळता इतरांना व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. केंद्र स्तर, राज्य किंवा जिल्हाधिकारी प्रशासनाकडून लेखी पत्रव्यवहार करणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच व्हीआयपी दर्शन मिळणार आहे.
आणखी वाचा