(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघरच्या खारेकुरणमध्ये 33 वर्षीय विवाहित महिलेची निर्घृण हत्त्या; संशयित ताब्यात
पालघरच्या खारेकुरणमध्ये विवाहित महिलेची निर्घृण हत्त्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पालघर : खारेकुरण गावामध्ये एका विवाहित महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. आरती मनीष पाटील, वय 33 वर्ष (माहेरचे नाव आरती चिंतामण अधिकारी) असे या हत्त्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरती ही शुक्रवारपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी पालघर पोलिस ठाण्यात तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी आरतीचा मृतदेह खारेकुरण गावाजवळील त्यांच्या शेतात आढळला असून तिचा चेहरा, डोकं दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आले होते.
याप्रकरणी तेजस देसले (22) या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, आरतीच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आरतीचा पती मनीष पाटील आणि इतर सासरची मंडळी असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी पालघर पोलिस अधिक तपास करत आहेत.
ऐन दिवाळी सारख्या आनंदाच्या सणाच्या काळात आरती मनीष पाटील या विवाहित महिलेची अत्यंत क्रूर व निर्दयपणे हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पालघरमध्ये आरतीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे, तर आरोपींविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरती अधिकारी आणि मनीष पाटील यांचे लग्न जानेवारी 2019 मध्ये झाले होते. परंतु, काही महिन्यातच तिला नवरा आणि सासू आणि दोन नणंदा यांच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आरती नागझरी येथे तिच्या माहेरी परतली होती. त्यानंतर काही दिवसांनी आरतीचा पती मनीष पाटील याने आरतीचा पुन्हा त्रास होणार नाही याचे आश्वासन दिल्यानंतर तिला पुन्हा खरेखुरण येथे घेऊन गेला होता. पण त्यानंतर देखील आरतीचा त्रास काही कमी झालेला नव्हता.
आरतीच्या हत्येप्रकरणी पालघर पोलिसांनी तेजस देसले (22) या खारेकुरण गावातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी आरतीचा मृतदेह खारेकुरण गावाजवळील त्यांच्या शेतात आढळला असून तिचा चेहरा, डोकं दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आहे होते. शिवाय तिच्या पायावर आणि इतर ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत.
त्यामुळे हे काम एकट्याचे नसून हत्येमागचे मुख्य सूत्रधार आरतीचा पती आणि इतर सासरची मंडळी असल्याचा आरोप आरतीच्या नातेवाईकांनी केला आहे. पती मनीष पाटील सासू आणि दोन नणंदा यांच्याकडून खूप त्रास होत होता. याप्रकरणी सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे.