Dhule Crime News : धुळे: शुभम साळुंके हत्या प्रकरणी भाजपाच्या विनोद थोरात यांच्यासह 10 आरोपींना 'मोक्का'
Dhule Crime News : धुळे हादरवणाऱ्या शुभम साळुंके हत्याकांड प्रकरणात भाजपाचे (BJP) विनोद थोरात (Vinod Thorat) यांच्यासह 10 जणांविरुद्ध 'मोक्का' लावण्यात येणार आहे.
धुळे : गेल्या महिन्यात शुभम साळुंके (Shubham Salunkhe) याची काही जणांनी निर्घुण हत्या केली होती. याप्रकरणी भाजपाचे (BJP) विनोद थोरात (Vinod Thorat) यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हे हिस्ट्रीशिटर असल्याने त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी, याकरीता तत्कालीन आझादनगर पोलीस ठाण्याचे (Azad Nagar Police Station) पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे परवानगी मागीतली होती. त्यानुसार गुन्हेगारांवर आता मोक्का अंतर्गत वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी सांगितले.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे शहरातील शुभम साळुंके याच्या हत्येसंदर्भात आज माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 8 ऑक्टोबर रोजी शुभम साळुंके या तरुणावर महेश पवार ऊर्फ लाल डोळा (रा. स्वामी नारायण कॉलनी, धुळे) अक्षय साळवे (रा. गायकवाड चौक, धुळे) गणेश माळी (रा. स्वामी नारायण कॉलनी, धुळे) भूषण वाडेकर (रा. शांतीनगर, धुळे), जगदीश चौधरी (रा. स्वामी नारायण कॉलनी, धुळे), शरद (पूर्ण नाव निष्पन्न नाही- रा. नाशिक) आणि इतर दोन ते तीन जणांनी धारदार कोयते, लोखंडी रॉड, फाईटरने शुभम आणि त्याच्या मित्रास मारहाण केली.
यावेळी शुभमला बळजबरीने दुचाकीवर बसवीत वरखेडी रोडवरील महानगरपालिका डम्पिग ग्राऊंडवर नेत त्याची हत्या केली. तसेच आरोपी विनोद रमेश थोरात (रा. मनमाड जीन, धुळे) आणि त्याचा सहकारी हर्षल रघुनाथ चौधरी यांनी गुन्ह्यातील आरोपींना पूर्व वैमनस्यातुन मयतास मारण्यासाठी सुपारी देऊन चिथावणी दिल्यामुळेच सदरचा गुन्हा घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी 9 ऑक्टोबर रोजी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे हे करीत होते. वरील सर्व आरोपींनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत संघटीत गुन्हेगारी करून तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेस पात्र असलेले गुन्हे केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तपासांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे 'भादंवि कलम 302 सह मोक्कांतर्गत कारवाईची परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांनी परवानगी दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना सोपविण्यात आला असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.