Patna News: घरात घुसून बहिण-भावाला जिवंत जाळलं, आई कामवारुन घरी येताच दार उघडं...; नेमकं काय घडलं?
Patna Crime News: पाटण्याच्या नागवा जानीपूर भागात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आलंआहे. यात कुटुंबातील दोन्ही मुलांना घरात घुसून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

Bihar Two Children Burnt: पाटण्याच्या नागवा जानीपूर भागात एक खळबळजनक घटना घडल्याचे उघड झाले आहे. आज (1 ऑगस्ट) दुपारी एका कुटुंबातील दोन्ही मुलांना घरात घुसून जिवंत जाळल्याचा धक्कादायक (Patna Crime News) प्रकार घडलाय. मुलांची आई घरी पोहोचली तेव्हा तिला घरातून धूर येत असल्याचं दिसलं. तर यावेळी घराचं दार बाहेरून उघडं होतं. आत गेल्यावर दोन्ही मुलं जळालेल्या अवस्थेत आढळली. मृतांमधील मुलीचं नाव अंजली होतं आणि ती नववीत शिकत होती, तर मुलगा अंश पाचवीत शिकत होता.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुलांची आई शोभा गुप्ता एम्समध्ये नर्स म्हणून काम करते. तर वडील एका खाजगी कंपनीत काम करतात. दरम्यान मुलांना नेमकं कोणी आणि का जाळलं याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं ती ओळखीची व्यक्ती असावी, असा संशय शहर पोलीस अधीक्षक भानू प्रताप सिंह यांनी व्यक्त केला. मात्र या हृदयद्रावक घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस (Crime News)या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
घरात घुसून दोन्ही मुलांना जिवंत जाळले
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. त्याच वेळी, गुन्हेगारांच्या या कृत्यानंतर स्थानिक लोकांमध्ये संताप आहे. मुले घरी एकटी असताना आणि शाळेतून नुकतीच आली असताना गुन्हेगारांनी ही घटना घडवल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर घटनेनंतर मुलांना पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. या घटनेबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. लोकांनी पोलिस-प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजीही केली. कुटुंबाने सांगितले की काही अज्ञात लोकांनी त्यांच्या घरात घुसून या दोन्ही मुलांना जिवंत जाळले. यावेळी दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या बेडवर पडले होते.
या प्रकरणात पोलिसांनी काय म्हटले?
या प्रकरणात, फुलवारी शरीफचे डीएसपी-2 दीपक कुमार म्हणाले कि, "दोन मुलांना जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. आम्ही घटनास्थळी आहोत. आम्ही तांत्रिक बाबींचाही तपास करत आहोत, या संदर्भात एक टीम देखील बोलावण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मुले घरी एकटीच होती." घटनेनंतर, पोलिसांनी एफएसएल टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे आणि या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे. हल्लेखोरांनी या मुलांना जाळले की त्यांचा मृत्यू आगीमुळे झाला. सध्या ही घटना का घडवली याचे कारण कळू शकले नाही.






















