Bhiwandi News: गुजरातमधून आलेला अंमली पदार्थांचा लाखोंचा साठा भिवंडीत जप्त, चार तस्करांना कोनगाव पोलिसांकडून अटक
Bhiwandi News: पोलिसांनी सापळा रचून चार जणांना अटक केली आहे. चारही तस्करांना 29 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भिवंडी : गुजरातमधून आलेला अंमली पदार्थांचा (Drugs) लाखोंचा साठा भिवंडीत जप्त करण्यात आला आहे. टेम्पोमधून लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या चार तस्करांना कोनगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या तस्करांकडून 17 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी सापळा रचून चार जणांना अटक केली आहे. चारही तस्करांना 29 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फईम मोहम्मदअली करेल (वय 42, रा. करेल हाऊस, कोनतरी कोनगांव ता. भिवंडी), निहाल अकिल शेख (वय 22, रा. कोनतरी कोनगांव), फैजान आयाज मोमीन (वय 21 रा. कोनतरी कोनगांव) आणि टॅम्पोचा चालक अजय रामलखन यादव (वय 27 रा. गुजरात ) अशी बेड्या ठोकलेल्या तस्करांची नावे आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने रचला सापळा
भिवंडीचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी भिवंडी परिसरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्करांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजेंद्र पवार यांनी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री व वितरण समुळ नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यातच पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिप बने यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिप बने, तपास पथकाचे सपोनि अभिजीत पाटील तसेच अन्न व औषध निरीक्षक प्राची चव्हाण या पथकाने 24 मार्च रोजी कोनतरी भागात सापळा रचला होता.
पोलीस पथकाने घेतले ताब्यात
त्य सायंकाळ साडे सातच्या सुमारास गुजरात राज्यातील वलसाड जिल्हयातून आलेला एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो संशयितरित्या आढळून आला. विशेष म्हणजे चारही तस्कर हे त्या टेम्पोमधून आणलेला अंमली पदार्थ (सिरप) चा साठा एका रिक्षातून दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलीस पथकाने त्यांच्या झडप घातली. टेम्पो आणि रिक्षासह ताब्यात घेतले. त्यानंतर चारही तस्करांवर कोनगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 273, 276 कलम 18 (क), 27 (घ) 27 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक केली आहे.
अटक तस्करांकडून 17 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
अटक केलेल्या तस्करांकडून पोलीस पथकाने नशेसाठी वापरणारे गुंगीच्या औषधाच्या 9 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या सहा हजार बाटल्या, 80 हजार रुपये किंमतीचा एका सफेद रंगाचा पिकअप टेम्पो आणि 50 हजार किंमतीची ऑटो रिक्षा असा 17 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, (आज) 25 मार्च रोजी चारही तस्करांना न्यायालयात हजर केले असता 29 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिप बने करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
