(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara Crime : भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर, दोन नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
Bhandara Crime News : पुन्हा एक 'निर्भया'. भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर. आणखी काही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता तर दोन नराधमांना घटनास्थळी नेऊन तपास सुरु.
Bhandara Crime News : भंडाऱ्यात (Bhandara) महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. 30 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती.
सुरुवातीला पीडितेला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्यामुळं सुरुवातीला डॉक्टरांनी ते थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर आवश्यक असलेली कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत. यात संपूर्ण गुन्हांत 3 आरोपींचा समावेश असल्यानं आता फक्त 2 आरोपी भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्यानं भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना 2 संशयित आरोपींसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. सध्या दोन्ही आरोपींना गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं असून फरार आरोपींचा शोध गोंदिया पोलीस घेत आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ पीडितेच्या भेटीला
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची भेट घेऊन रुग्णालय प्रशासनासोबत तिच्या प्रकृती संदर्भात बोलण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत संवाद साधून पीडितेच्या आरोग्यबाबत विचारपूस केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :