आईला झोप लागली अन् परळी रेल्वे स्थानकात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, परळीकरांचा संतप्त मोर्चा
बीड जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली.

Beed Crime: परळी रेल्वे स्थानक परिसरात चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या अमानुष कृत्याविरोधात आज परळी शहरात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भव्य मूक मोर्चा काढला. या वेळी नागरिकांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे अशी जोरदार मागणी केली. (Beed Crime News)
बीड जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात (Parli Railway Station) अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी बरकत नगर येथील आरोपीला अटक केली आहे.
राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा
नागरिकांच्या आवाहनानुसार आज सकाळी शहरात परळी बंद पाळण्यात आला. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तसेच प्रकरण लांबणीवर न जाता ते फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली. यासोबतच परळी रेल्वे स्थानकात महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली.
या घटनेच्या दिवशी रेल्वे स्थानकातील एका कर्मचाऱ्याने आरोपीविरुद्ध योग्य कारवाई केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही मोर्चात करण्यात आली.
घटनेचा थरकाप उडवणारा तपशील
रविवारी (31ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. पंढरपूर येथील एक दाम्पत्य रोजगाराच्या शोधात परळीत आले होते. रेल्वे स्थानकावर थांबले असताना आई आजारी असल्याने ती झोपून गेली. त्याच वेळी आरोपीने संधी साधत चार वर्षांच्या चिमुरडीला एका कोपऱ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर रडत-बिचकत ती आईकडे परतली आणि विचारपूस केल्यानंतर सत्य बाहेर आले. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.
आरोपी अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत बरकत नगर येथील आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, तोपर्यंत नागरिकांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही मोर्चात देण्यात आला.या घटनेने परळीतील नागरिकच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून, समाजातील सर्व स्तरांतून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.























