Badlapur Case : चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी नागरिकांचा उद्रेक, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
चिमुकल्यांच्या आरोपीला फाशी द्या, या एका मागणीसाठी बदलापुरकर एकवटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून याप्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची घोषणा करण्यात आली आहे.
Badlapur Case : बदलापूर : बदलापुरातील अत्याचार प्रकरणी सकाळपासूनच नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं होतं. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवघं बदलापूर एकवटलं होतं. आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या, एवढी एकच मागणी लावून धरली होती. बघता बघता आंदोलनाला काही वेळासाठी हिंसक वळण लागलं होतं. सकाळपासून रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्यानं आवाहन करणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक सुरू केली, तर दुसरीकडे शाळेबाहेर एकवटलेल्या आंदोलकांनी शाळेचा गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. अशातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं, तरीदेखील आंदोलक एकाच मागणीवर ठाम होतं. आरोपीला फाशी द्या, अशी एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून याप्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची घोषणा करण्यात आली आहे.
पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बदलापूर प्रकरणी SIT नेमण्यात आली आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत."
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. सकाळपासूनच नागरिकांनी शाळेला घेरा घातला असून बदलापूर स्थानकात रेल रोको देखील केला आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, पोलिसांनी देखील आवाहन केलं, मात्र तरीदेखील नागरिक आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आंदोलकांकडून रेल रोको
बदलापुरात चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. अशातच आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलन केलं. बदलापूर बंदच्या दरम्यान आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक केली. तर दुसरीकडे शाळेच्या बाहेर एकवटलेले आंदोलक शाळेचं गेट तोडून आतमध्ये घुसले आणि त्यांनी शाळेची तोडफोड केली. शाळेबाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. काही काळ हिंसक झालेल्या आंदोलन पुन्हा शांततेत सुरू झालं असून सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा बदलापुरात तैनात करण्यात आला आहे.