Badlapur Crime News : प्रॉपर्टीच्या वादातून सासऱ्यानं आधी सुनेच्या डोक्यात वार केले आहेत. त्यानंतर घर पेटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. या घटनेनं बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून भितीचं वातावरणही निर्माण झालं आहे.
बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. काल (बुधवारी) दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता. तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात होते. त्यावेळी सासरे आणि सूनेमध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाले. हा वाद विकोपाला गेला आणि राग अनावर झाल्यानं किसन जाधव यांनी आपल्या सूनेच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केले. सासऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाली.
जखमी सुनेनं आरडाओरडा केल्यानं शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेलं. मात्र यानंतर किसन जाधव यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कपाट लावलं आणि संपूर्ण घर पेटवून दिलं. यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या घरातून धूर निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलानं जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झालं होतं, तर किसन जाधवही आगीत होरपळून निघाले होते. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, सासऱ्यानं केलेल्या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाली होती. सुनेवर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तसेच हा सर्व प्रकार प्रॉपर्टीच्या वादातूनच घडल्याची माहिती जाधव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळं बदलापूर शहरात मोठी खळबळ माजली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- आर्थिक चणचणीमुळे पंढरपूर ST डेपोतील कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल; शासनाला अजून किती आत्महत्या पाहायच्यात कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल
- 'या' नावानं आलेला ईमेल उघडू नका! महाराष्ट्र सायबर पोलिसांचं आवाहन, पाकिस्तानी हॅकर्सचा ट्रॅप!
- मद्यधुंदाची मस्ती, दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड, पोलिसांनी आरोपींची उतरवली मस्ती
- बार्शीत महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या, मुलानेच हत्या केल्याचा संशय, तपासासाठी पथक रवाना