सोलापूर : सोलापुरातील बार्शी (Solapur Barshi) तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडलीय. झोपलेल्या ठिकाणीच डोक्यात दगड घालून एका महिलेचा निर्घुण हत्या करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह गादीवरून ओढत घराबाहेर आणून झुडपात टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 रा.वाणी प्लाॅट बार्शी असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांना महिलेच्या मुलावरच संशय आहे. त्यामुळे मृत महिलेचा मुलगा श्रीराम नागनाथ फावडे याच्यावर हत्येचा गुन्हा केल्याचा आरोप ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बार्शी पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण माळी यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांना वाणी प्लॉट या ठिकाणी घराच्या कपाऊंड मध्ये एका महीला मयत अवस्थेत झुडपामध्ये पडलेली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सविस्तर माहिती घेतली असता मृतदेह रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 वर्षे रा वाणी प्लॉट बार्शी हिचाच असल्याचे तिच्या पतीने सांगितले.
मयत महिलाला रुक्मिणी आणि तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे वय 21 वर्षे हे दोघेजण सदर ठिकाणी राहत होते. लहान मुलगा आणि पती यांच्यात नेहमी वाद होत असल्याने ते बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. तसेच मोठा मुलगा आणि मयत रुक्मिणी यांच्यात पैशा वरुन नेहमी वाद होत होते. त्या बाबत पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दाखल होत्या.
मयत महिलेचे पती नागनाथ फावडे आणि त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरते कपडे देखील त्याने नेले होते. श्रीराम फावडे याने यापुर्वी देखील आईस आणि भावास मारहाण केली होती. त्यामुळे त्यानेच आई रुक्मिणीचा डोक्यात दगड घालून ठार मारल्याचा संशय पोलिसांना आहे.
याच संशयातून पोलिसांनी श्रीराम फावडे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.