पंढरपूर : लॉकडाऊनमुळे एसटी अजूनही रुळावर आलेली नाही. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या विवंचनेतून अनेकजण टोकाचं पाऊल उचलत आहेत. मागील काही महिन्यात अनेकांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. अशीच एक घटना पंढरपूर येथे घडलीय. एसटी कार्यशाळेतील कर्मचारी दशरथ गिड्डे यांनी आर्थिक चणचणीला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 


यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाला अजून किती आत्महत्या पाहायच्या आहेत? असा संतप्त सवाल केला आहे. पंढरपूर डेपोमधील दशरथ गिड्डे काल रात्री ड्युटी संपवून घरी गेले होते. आज पहाटे साडेपाच वाजता त्यांनी आपल्या पत्नीला फिरायला पाठवून दिले आणि भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी फिरून परत आल्यावर दारे बंद दिसल्याने तिने सर्वांना बोलावले असता दशरथ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत दशरथ होते. कर्जामुळे त्यांच्या हातात केवळ सहा ते सात हजार रुपये पगार येत होता. दशरथ यांनी खर्च परवडत नाही म्हणून आपल्या दहावीच्या मुलाला पाहुण्यांकडे शिकायला ठेवले होते तर सातवीत शिकणारी मुलगी त्याच्यापाशी होती.  


एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता होत असून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात घरातील खर्च भागवणे अवघड बनले होते. यातच घराचे दोन महिन्याचे भाडे देणे थकीत होते. पण त्याला कोठून पैशाची सोय न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. सध्या कोरोनामुळे वेतनात थोडे मागेपुढे होत असले तरी केवळ चालू महिन्याचा पगार थकीत असल्याचे डेपो मॅनेजर नंदकुमार सुतार यांनी सांगितले. तर आर्थिक चणचणीमुळे गेल्या आठ महिन्यात 15 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.


वेळेवर पगार न झाल्याने बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
एकतर जास्तीचे काम आणि त्यातही तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि त्यात पगार वेळेवर न झाल्याने बीडमधल्या तरुण ड्रायव्हरने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तुकाराम सानप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव येथील आहेत. एकुलत्या एक तरुण मुलाने आपलं आयुष्य संपवल्याने म्हातारपणी आजी आजोबांवर आता नातवाला सांभाळण्याची वेळ आलीय. याला कारण ठरलाय एसटीचा वेळेवर ना होणार पगार.