Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Baba Siddique Shot Dead : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर काल रात्री गोळीबार करण्यात आला. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. तर तिसर्या आरोपीचा सध्या शोध घेतला जात आहे. आता या आरोपींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी या खोलीसाठी महिन्याला 14 हजार भाडं देत होते. चार जणांनी मिळून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची 200000 रुपयांची सुपारी घेतली होती. प्रत्येकी 50 हजार रुपये ते वाटून घेणार असल्याचेही कळते.
आरोपी बिष्णोई गँगच्या संपर्कात
पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले होते. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता. त्याच्या संपर्कात हे तीन आरोपी आले होते. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका फरार आरोपीच्या शोघासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी देखील आरोपींचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात आले होते.
बाबा सिद्दिकींवर आज अंत्यसंस्कार
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाणार आहे. आज रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल. मात्र या आधी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह, अनेक राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येईल. रात्री 7 वाजता ही प्रार्थना त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान येथे दफनविधी होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर
तिघं आले, गोळ्या झाडल्या, पण सिद्दिकींच्या हत्येमागचा खरा नराधम वेगळाच? चौथा मास्टरमाईंड नेमका कोण?