Baba Siddique Death Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर शुटर तिथेच थांबला होता, पोलिसांच्या डोळ्यांसमोर असूनही..... तपासात खळबळजनक खुलासा
Baba Siddique Death Case: शिवकुमार गौतमनं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिष्णोई गँगनं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याचं काम दिलं होतं, असंही त्यानं सांगितलं.
Baba Siddique Death Case: अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नव्यानं अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाचजणांत शिवकुमार गौतम (Shivkumar Gautam) उर्फ शिवा या मुख्य शूटरचाही समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष पथकानं या पाचजणांना परराज्यांमधून अटक केली आहे. त्या पाच आरोपींना सोमवारी मुंबईतल्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मुख्य शूटर शिवकुमार गौतमला रविवारी बहराइचमधून अटक करण्यात आलेली. शिवकुमार गौतमनं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिष्णोई गँगनं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याचं काम दिलं होतं. अनमोल बिष्णोईनं त्याला आधी जे टार्गेट येईल, त्याला गोळ्या घालण्याची सूचना केली होती, असंही त्यानं सांगितलं.
शिवकुमार गौतमनं पुढे बोलताना सांगितलं की, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर त्यांची योजना उज्जैनला, नंतर वैष्णोदेवीला आणि शेवटी परदेशात पळून जाण्याची होती, पण ही योजना यशस्वी झाली नाही. मुंबईतून पळून जात असताना झारखंडला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या फोनवरून त्यानं सहआरोपी अनुराग कश्यपशी संपर्क साधला होता, असंही गौतमनं सांगितलं. हत्येपूर्वी आणि नंतर गौतमचे शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्याशी नियमित बोलणं होतं.
बाबा सिद्दिकींची हत्येनंतर कपडे बदलून हत्यारा तिथेच उभा होता...
शिवकुमार गौतमच्या चौकशीदरम्यान सांगितलं की, 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी तात्काळ तिथून फरार झाला नाही. याव्यतिरिक्त त्यानं आपले कपडे बदलले आणि त्यानंतर बराच वेळ घटनास्थळावर सुरू असलेला हंगामा पाहत होता.
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गौतमनं चौकशीत पुढे सांगितलं की, गोळी मारल्यानंतर त्यानं थोडं लांब जाऊन शर्ट बदललं आणि तिथे जमा झालेल्या गर्दीत घुसला. त्याला कुणी ओळखू नये म्हणून त्यानं असं केल्याचं चौकशीत सांगितलं आहे. तो तिथे होता, याबाबत त्यावेळी मुंबई पोलिसांना काहीच माहिती नव्हती. त्यानंतर तो रिक्षानं कुर्ला स्टेशनला पोहोचला. तिथून लोकलनं ठाण्याला गेला. पुढे ठाणा स्टेशनवरुन त्यानं एक एक्सप्रेस गाडी पकडली आणि पहाटे 3 च्या सुमारास पुण्याला पोहोचला. तिथे त्यानं आपला मोबाईल फेकून दिला.
आरोपीनं चौकशीत सांगण्यानुसार, पुण्यात तो तब्बल सात दिवस राहिला, नंतर तिथून ट्रेननं झाशीला गेला आणि तिथे पाच दिवस राहिल्यानंतर लखनौला पोहोचला. लखनौमध्ये त्यानं एक नवा मोबाईल खरेदी केला आणि आपल्या साथीदारांशी संपर्क साधला. लखनौमध्ये 11 दिवस राहिल्यानंतर पाच दिवसांआधीच तो बहराइचला पोहोचला. जिथे त्याच्या साथीदारांनी जवळच्याच एका गावात त्याच्यासाठी सुरक्षित ठिकाणाची व्यवस्था केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमनं मुंबईहून बहराइचपर्यंतचा प्रवास सार्वजनिक वाहानानं केला. बिष्णोई गँगनं त्याला सांगितल्यानुसार, तो बहराइचहून 10 नोव्हेंबरला नेपाळला पळून जाण्याचा प्लान रचत होता.
अनमोल बिश्नोईनं शिवकुमार गौतमचं मनोबल वाढवलं
आरोपी शिवकुमार गौतम यानं पोलिसांना सांगितलं की, बाबा सिद्दिकींची हत्या करण्यापूर्वी त्याचं अनमोल बिष्णोईशी बोलणं झालं होतं आणि यादरम्यान अनमोलनं त्याचं मनोबल वाढवलं होतं. खून करण्यापूर्वी अनमोल बिश्नोईनं शूटर गौतमला सांगितलं होतं की, तो जे काही करणार आहे ते देव आणि समाजासाठी आहे. त्यामुळे त्यांनी न घाबरता हे काम पूर्ण करावं.
क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी सांगितलं की, गौतमनं चौकशीदरम्यान सांगितलं आहे की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. हत्येनंतर तो व्हीओआयपी कॉलद्वारे त्याच्या साथीदारांशी बोलायचा.