Amravati Crime : अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची अज्ञातांकडून हत्या
Amravati Crime : अमरावतीमध्ये अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपीने रात्री 1.30 वाजता घरी आणून सोडलं. मात्र, त्याच परिसरात अज्ञात जमावाकडून आरोपीची हत्या करण्यात आली.
Amravati Crime : अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना अमरावतीमध्ये (Amravati) घडली आहे. जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात हा प्रकार घडला. आरोपीने अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीला रात्री 1.30 वाजता घरी आणून सोडलं. मात्र, त्याच परिसरात अज्ञात जमावाकडून आरोपीची हत्या करण्यात आली. नईम खान असं आरोपीचं नाव असून जमावाच्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण घटना?
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीची रात्री अज्ञात जमावाकडून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगर गारोडी पुरामधील आरोपी नईम खान याचा मध्यरात्री खून करण्यात आला. आरोपीने 21 सप्टेंबर रोजी चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. आरोपी नईम खान, शेख अशफाक, अतुल कुसराम आणि चांदूरवाडी येथील एक आरोपी एका गाडीतून मुलीच्या घरी आले होते. या ठिकाणी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवत मुलीला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून घेऊन गेले. या घटनेमुळे कुटुंबीय भयभीत झाले होते.
यानंतर कुटुंबियांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंवी कलम 363, 452, 506, 34 तसेच शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला. या प्रकरणी मुलगी आणि आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली होती. परंतु एक दिवस उलटून गेल्यावरही मुलगी न सापडल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली. मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज बांधवांनी काल (22 सप्टेंबर) पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला होता.
मुलीला घरी आणताच आरोपीची जमावाकडून हत्या
पोलीस दोन दिवसांपासून त्या मुलीचा शोध घेत असताना आरोपीने काल रात्री अल्पवयीन मुलीला घरी आणून सोडलं. आरोपी हा परत त्याच परिसरात आला तेव्हा अज्ञात जमावाने त्याचा खून केला. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करत आहेत.
घटनाक्रमावर एक नजर...
दिनांक 21/09/2022 रोजी चांदुर रेल्वे शहरात चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण
दिवसरात्र आरोपीचा शोध सुरु, पोलीस यंत्रणेमार्फत आरोपीच्या शोधात पथके पाठवली
दिनांक 22/09/2022 रोजी नागरिकांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा
दिनांक 23/09/2022 रोजी मध्यरात्री 1.30 वाजता आरोपीने अल्पवयीन मुलीला तिच्या घरी आणून सोडलं. त्याच रात्री आरोपी नईम खान याचा अज्ञातांकडून खून