Ahmednagar News : नगर-दौंड महामार्गांवर ट्रक आणि झायलो कारचा अपघात; अपघातात 3 ठार 8 जखमी
Ahmednagar Crime News : जुने वर्ष सरत असताना या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात काळाने शेख कुटुंबियांवर घाला घातला.
Ahmednagar Crime News : अहमदनगर- दौड महामार्गांवर ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात (Accident news) झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगर-श्रीगोंदा रस्त्यावर (Ahmednagar Shrigonda Road) झायलो कार आणि ट्रक समोरासमोर आल्याने हा भीषण अपघात झाला.
जुने वर्ष सरत असताना या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात काळाने शेख कुटुंबियांवर घाला घातला. या भीषण अपघातात शेख परिवारातील 13 वर्षाच्या दोघांसह 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शाबाज शेख, गाजी बांगी आणि लुजैन शेख असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्याशिवाय, अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी काहींना दौंड तर काहीना श्रीगोंदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शेख कुटुंबिय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याणवरून आले असल्याची माहिती आहे..या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, 10 ते 15 जण जखमी
मनोर-विक्रमगड रोडवर बोरांडा येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 जण जखमी झाले आहेत. पालघर-शिर्डी बसला मालवाहून ट्रकने जोरदार धडक दिली, या अपघातामध्ये दोन चिमुकल्यांचा जागीट मृत्यू झाला आहे, तर दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकाच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघरमधील या अपघातामुळे मनोर-विक्रमगड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
अपघातामध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे, बसच्या अर्ध्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मोखाडाच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांच्यासमोरच हा अपघात झाला. जखमींच्या बचाव कार्यात खासदार गावितही सरसावले. त्यांनी आपल्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.