मुंबई : सरकारच्या एनपीएस (न्यू पेन्शन स्कीम) योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयुष्याच्या उत्तरार्धात पेन्शन मिळते. निवृत्ती घेतल्यानंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून अनेकजण नोकरीवर असतानाच या योजनेत गुंतवणूक चालू करतात. दरम्यान, या योजनेत तुम्ही दरवर्षी 50 हजार रुपये जमा केल्यास जुन्या करप्रणालीनुसार तुम्हाला करात काही सुट मिळते. मात्र याच एनपीएस योजनेविषयी लोकांना अनेक प्रश्न आहेत. या योजनेत गुंतवणूक करण्याचे थांबवल्यास गुंतवलेले पैसे परत मिळतात का? एकदा थांबवलेली एनपीस योजना (What Is NPS) पुन्हा चालू करता येते का? असे अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्वभूमीवर एनपीएस (NPS Scheme) योजनेविषयी सर्वकाही जाणून घेऊ या..


एनपीएस योजनेत कशी गुंतवणूक करावी?


ही केंद्र सरकारची एक योजना आहे. प्रोव्हिडेंट फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे (PFRDA) या योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेत देशातील कोणतीही व्यक्ती पैसे जमा करू शकते. या योजनेच्या माध्यमातून जमा झालेले काही पैसे सरकार शेअर बाजारात गुंतवते. त्यातून मिळालेल्या रिटर्न्सच्या आधारावरच तुम्हाला 60 वर्षांनंतर पेन्शन दिले जाते. 


एनपीएस योजनेत गुंतवणूक करणे फार सोपे आहे. म्यूच्यूअल फंड कंपन्या किंवा बँकेत चौकशी केल्यावर तुम्हाला लगेच कोणीही या योजनेची माहिती देईल. तुम्हाला परवडणारा प्लॅन घेऊन तुम्ही या योजनेत पैशांची गुंतवणूक करू शकता.


टीयर- 1 आणि टीयर-2 काय आहे?


एनपीएस योजनेत टीयर- 1 आणि टीयर-2 असे असे दोन पर्याय असतात. या दोन्ही पर्यायांत तुम्हाला तुम्ही गुंतवलेली रक्कम काढून घेता येते. टीयर- 1 या पर्यायात 60 वर्षे होण्याआधीच तुम्ही गुंतवलेली रक्कम काढू शकता (प्रि मॅच्यूअर विदड्रॉअल). मात्र त्यासाठी तुम्ही या योजनेत गेल्या दहा वर्षांपासून पैशांची गुंतवणूक केलेली असायला हवी. प्री मॅच्यूअर विदड्रॉअलमध्ये तुम्ही गुंतवलेल्या एकूण रकमेच्या वीस टक्के रक्कम तुम्हाला मिळते. उर्वरित 80 टक्के अॅन्यूईटी प्लॅन (एका प्रकारचा पेन्शन प्लॅन) मध्ये जमा केले जातात. तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम 2.5 लाख रुपये असेल तर तुम्हाला 100 टक्के रकम दिली जाते.


प्री मॅच्यूअर विदड्रॉअल करण्याची सोय


टियर-2 चा पर्यायातही तुम्हाला प्री-मॅच्यूअर विदड्रॉअल करता येते. मात्र ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी, घरबांधणी, उपचार या कामांसाठी प्री मॅच्यूअर विदड्रॉअल करता येते. या योजनेत 60 वर्षे होईपर्यंत फक्त तीन वेळाच प्री मॅच्यूअर विदड्रॉअल करता येते. यातही प्रत्येक विदड्रॉअलमध्ये कमीत कमी पाच वर्षांचे अंतर असायला हवे. 


एकदा थांबवलेली एनपीएस योजना पुन्हा चालू होते का? 


समजा तुम्ही काही वर्षे एनपीएस योजनेत पैशांची गुंतवणूक केली आणि त्यानंतर तुम्ही पैसे जमा करण्याचे थांबवले तर मग भविष्यात मला याच योजनेत पैसे गुंतवता येतील का? असे विचारले जाते. मात्र याचे उत्तर हो असे आहे. त्यासाठी काही दंड भरून तुम्ही पुन्हा एकदा ही योजना चालू करू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत संपूर्ण वर्षात कमीत कमी 500 रुपये न भरल्यास तुमचे खाते फ्रीझ केले जाते. ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला तुमचा पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर द्यावा लागतो. तसेच बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये योजना चालू करण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर दंड भरून तुम्ही ती योजना पुन्हा चालू करू शकता.


(टीप- ही फक्त प्रातिनिधीक माहिती आहे. अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधारा, त्यांचा सल्ला घ्यावा.)


हेही वाचा :


'हे' पाच मिडकॅप फंड, ज्यांनी अनेकांना केलं लखपती, तीन वर्षांपूर्वी SIP करणारे आज मालामाल!


विमा कंपनी क्लेम नाकारत असेल तर काय करावं? 'या' दोन मार्गांनी मिळू शकतो क्लेम!


जॉन्सन अँड जॉन्सनचा मोठा निर्णय, कर्करोग झाल्याचा दावा करणारे खटले मिटवणार, 6.5 अब्ज डॉलर्स देण्याची तयारी!